उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थी घडविण्याचा निर्धार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

जळगाव - प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर शालेय अभ्यासक्रमांबरोबरच सामाजिकता व राष्ट्रीयत्वाचा संस्कार व्हायला हवा. यामुळेच या वयातील मुलांची विविध उपक्रमांसह प्रयोगांतून बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्याची गरज असते. त्यादृष्टीने आगामी काळात शाळांमधून अशा उपक्रमशील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘सकाळ’तर्फे आयोजित चर्चासत्रात केला.

जळगाव - प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर शालेय अभ्यासक्रमांबरोबरच सामाजिकता व राष्ट्रीयत्वाचा संस्कार व्हायला हवा. यामुळेच या वयातील मुलांची विविध उपक्रमांसह प्रयोगांतून बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्याची गरज असते. त्यादृष्टीने आगामी काळात शाळांमधून अशा उपक्रमशील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘सकाळ’तर्फे आयोजित चर्चासत्रात केला.

औद्योगिक वसाहत परिसरातील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात ‘सकाळ- एनआयई’च्या माध्यमातून आज दुपारी ‘शिक्षणातील प्रयोगशीलता व गुणवत्तावाढ’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यात जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी वसंतराव महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. चर्चासत्राला शहरातील या. दे. पाटील शाळेचे मुख्याध्यापक संजय खंबायत, का. ऊ. कोल्हे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे. आर. गोसावी, नंदिनीबाई विद्यालयाचे दीपक बारी, बाहेती विद्यालयाचे नामदेव चौधरी, जिजामाता विद्यालयाचे राजेंद्र खोरखेडे, भगीरथ इंग्लिश स्कूलचे अशोक पारधे, ला. ना. विद्यालयाचे दुर्गादास मोरे, सचिन देशपांडे, झांबरे विद्यालयाचे दिलीपकुमार चौधरी, प्रगती माध्यमिक विद्यालयाच्या मनीषा पाटील, मानवसेवा माध्यमिक विद्यालयाच्या प्रतिभा सूर्यवंशी, सावखेडा येथील शानभाग विद्यालयाचे उमेश इंगळे, लुंकड कन्या शाळेचे भगवान पाटील, सिद्धिविनायक विद्यालयाचे रमेश खोडपे उपस्थित होते. ‘एनआयई’ समन्वयिका हर्षदा नाईक यांनी उपक्रमाची माहिती दिली. अमोल भट यांनी सूत्रसंचालन केले.
शिक्षणाधिकारी महाजन म्हणाले, की शाळांमध्ये रिकाम्या तासिकांच्या वेळी पुस्तकांची पेटी उपलब्ध करून द्यायला हवी. सर्वांत महत्त्वाचे शिक्षकांनी अगोदर तंत्रस्नेही व्हायला हवे, म्हणजे विद्यार्थ्यांसमोर सर्व साहित्य उपलब्ध करता येणे सोपे होईल.

प्रशासन अधिकारी वसंतराव महाजन म्हणाले, की वाचनकौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने शहरातील शाळांमध्ये ‘द्या टाळी’ उपक्रम राबविला. तसेच ‘एक तास वाचनासाठी’ उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे सोपे जाते. गणिती क्रिया उपक्रम राबवून गणिताविषयी मुलांच्या मनातील भीती काढायला हवी.

वेगवेगळ्या करिअरच्या दृष्टीने उपक्रम - दिलीप चौधरी
आज पालकांनीच मुलांचे बालपण हिरावले आहे; पण मुलांचा सर्वांगीण विकास करायला हवा. यादृष्टीने आम्ही झांबरे विद्यालयात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर कसा करू शकेल? याचा विचार करून उपक्रम राबवीत आहोत. यात प्रामुख्याने शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी क्रीडा स्पर्धा, गायन, नृत्य स्पर्धा, उद्योजकतेच्या दृष्टीने दरवर्षी ‘क्षेत्रीय भेटी’चा उपक्रम राबविला जातो. इतकेच नाही, तर कोणी राजकारणात करिअर करू इच्छितात, यासाठी प्रत्येक वर्गात मंत्रिमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना काम करायला लावले जात असल्याचे दिलीप चौधरी यांनी सांगितले.
 

पायाभूत चाचणी ठरतेय महत्त्वाची - जे. आर. गोसावी
अभ्यास आणि कलांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनस्तरावरून उपक्रम सुरूच असतात. यासोबतच कोल्हे विद्यालयात मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन कृतिशील शिक्षण दिले जाते. बऱ्याचदा आठवी- नववीत अप्रगत विद्यार्थी आढळून येतात. त्यांना बाजूला काढून पायाभूत चाचणी घेतली जाते. तसेच तंत्रशिक्षण, शाळासिद्धी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत असतात.

कौशल्य विकास अन्‌ सुप्तगुणांना चालना - अशोक पारधे
आजच्या स्थितीला सर्वांत मोठा विषय म्हणजे दप्तराचे ओझे हा आहे. ओझे कमी करण्यासाठी वर्गातील एकाच बाकावर बसणाऱ्यांना पुस्तके विभागून आणणे, शंभर पानी वह्या आणण्याच्या सूचना आहेत, तसेच परिपाठ घेणे हा उपक्रम राबवीत शाळेतील प्रत्येक तुकडीला एक- एक दिवस ठरवून दिला आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याची संधी मिळते. परिणामी त्याच्यात ‘स्टेज डेअरिंग’ वाढते. अशा पद्धतीने भगीरथ स्कूलमध्ये कौशल्य विकास व विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना चालना देण्याचे काम केले जात असल्याचे अशोक पारधे यांनी सांगितले.

वाचनकौशल्यावर भर - प्रतिभा सूर्यवंशी
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी मानवसेवा विद्यालयात रोज शेवटच्या तासिकेला विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले जाते. यासाठी प्रत्येक वर्गात अभ्यासमंत्री निवडण्यात आला आहे. याशिवाय, दहा वर्षांपासून नर्सरी ते दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला जातो. यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ‘शाळेसाठी एक पुस्तक भेट’ देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मुलींच्या सशक्‍तीकरणासाठी कार्यशाळा, मातृप्रबोधन कार्यक्रम, यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिभा सूर्यवंशी म्हणाल्या.

पुस्तकासोबत तंत्रशिक्षण - मनीषा पाटील
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यादृष्टीने प्रगती विद्यालयात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. पुस्तकांसोबत तंत्रशिक्षणाची जोड दिली जात आहे. विद्यार्थ्यांकडून हस्तलिखित तयार केले जाते, तसेच वर्षभर झालेल्या विविध उपक्रमांचा ‘स्लाइड शो’ तयार करून वार्षिक स्नेहसंमेलनात दाखविला जातो, असे मनीषा पाटील म्हणाल्या.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा - राजेंद्र खोरखेडे
शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके शासनस्तरावरून उपलब्ध करून दिली जातात; परंतु जिजामाता विद्यालयातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘केशवस्मृती’च्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून घेत असतो, तसेच शाळेतील दहावीतील बहुतांश विद्यार्थी क्‍लास लावू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेत रात्रीची शाळा घेत असून, त्यांच्या प्रगतीत भर पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजेंद्र खोरखेडे यांनी सांगितले.

जिल्हा प्रगत करण्यासाठी हवे प्रयत्न - संजय खंबायत
शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमात शाळांमध्ये उपक्रम राबवून मूल्यांकन मिळविले जाते. मोठी गुणवत्ता उभारणीसाठी हा उपक्रम निश्‍चितच चांगला आहे. त्याच अनुषंगाने ‘सकाळ’ने गुणवत्तावाढीच्या दृष्टीने राबविलेला उपक्रम निश्‍चितच एक प्रेरणास्रोत होऊ शकतो. विद्यार्थी घडविण्याचे काम ‘सकाळ’ करीत असून, यांसारख्या उपक्रमांमधून जिल्हा प्रगत कसा होईल, यादृष्टीने प्रत्येक शिक्षकाने काम करायला हवे, असे आवाहन या. दे. पाटील शाळेचे मुख्याध्यापक संजय खंबायत यांनी केले.

विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता आणि उपक्रमशीलता आवश्‍यक विषय आहेत. यासाठी शासनाने धोरण आखून विद्यार्थी अधिक प्रगत करण्यावर भर दिला आहे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडताना जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडेल. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमामुळेच प्राथमिक व जिल्हा परिषद शाळांमध्ये बदल होत आहेत. आता शाळा डिजिटल करण्यावर भर दिला जा आहे. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे.
- देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’चा पहिला टप्पा संपला असून, यानुसार वाटचाल सुरू आहे. तंत्रस्नेही शिक्षक होण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोबाईल डिजिटल शाळादेखील सुरू केल्या असून, नव्या टेक्‍नॉलॉजीने शिक्षण देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत वाचन उपक्रम, गणिती क्रिया आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मुलांना देण्यावर भर असायला हवा.
- वसंतराव महाजन, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ

‘सकाळ- एनआयई’चा उपक्रम स्तुत्य
आजच्या स्थितीला शालेयस्तरावरही गुणवत्तेची एक स्पर्धा लागलेली आहे. त्याअनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ- एनआयई’च्या माध्यमातून एक गुणवत्तापूर्वक उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलांना टीव्ही, मोबाईलच्या आहारी जाऊ न देता याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना ज्ञान देण्यावर भर राहणार असल्याचे मत चर्चासत्रात मांडण्यात आले असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढ आणि शाळा मूल्यांकनात वाढ होण्याच्या दृष्टीने ‘सकाळ- एनआयई’चा उपक्रम हा स्तुत्य असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी मांडल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgav news Determined to develop students from ventricious learning!