अंधारातलं जिणं आणखी किती वर्षे नशिबी?

विनायक पाटील
शुक्रवार, 4 मे 2018

आमळी - धुळे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण, अतिदुर्गम भागामुळे हिंस्त्रश्‍वापदांचा वावर असलेल्या आमळी ग्रामपंचायतअंतर्गत जांभाळीपाडा चाळीस वर्षांनंतरही विजेच्या सुविधेपासून पारखे आहे. सातत्याने मागणी करूनही वीज कंपनी दखल घेत नसल्यामुळे आदिवासी ग्रामस्थांच्या जीवनात ‘प्रकाश’ उजळलेला नाही. असे अंधारातले जिणे आणखी किती वर्षे नशिबी राहील, असा प्रश्‍न उपस्थित करत संबंधित ग्रामस्थ स्वतःला कोसतात. 

आमळी - धुळे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण, अतिदुर्गम भागामुळे हिंस्त्रश्‍वापदांचा वावर असलेल्या आमळी ग्रामपंचायतअंतर्गत जांभाळीपाडा चाळीस वर्षांनंतरही विजेच्या सुविधेपासून पारखे आहे. सातत्याने मागणी करूनही वीज कंपनी दखल घेत नसल्यामुळे आदिवासी ग्रामस्थांच्या जीवनात ‘प्रकाश’ उजळलेला नाही. असे अंधारातले जिणे आणखी किती वर्षे नशिबी राहील, असा प्रश्‍न उपस्थित करत संबंधित ग्रामस्थ स्वतःला कोसतात. 

धुळे शहरापासून पश्‍चिमेला शंभर किलोमीटरवर आमळी आहे. टेकडीवर वसलेले निसर्गरम्य, पर्यटनस्थळ म्हणून खुणावणारी मनमोहक अलालदरी, या दरीचा एक कडा जिल्ह्याची हद्द, तर दुसरी कडा नवापूर म्हणजेच नंदुरबारची हद्द आहे. अतिदुर्गम भागातल्या आदिवासीबहुल आमळी ग्रामपंचायतअंतर्गत हिंस्त्रश्‍वापदांचा वावर असतो. या ग्रामपंचायतीत भोरटीपाडा, मारखडी, उमरीपाडा, जांभाळीपाडा, विसपुडेचा समावेश आहे. यापैकी एकमेव जांभाळीपाडा या चाळीस वर्षांहून अधिक काळ वास्तव्य असलेल्या पाड्याला विजेच्या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थ कोंडू पवार, धना बोरसे, दिलीप मोरे सांगतात. 

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात 
आमळीपासून दोन किलोमीटरवरील जांभाळीपाड्याची लोकसंख्या २५० आहे. जिल्हा परिषदेची दोन शिक्षकी पहिली ते चौथीपर्यंत मराठी शाळा असून ३१ विद्यार्थी आहेत. विजेअभावी या शाळेतील संगणक धूळखात पडून आहेत. विद्यार्थ्यांना सायंकाळनंतर अभ्यासाची सोय नाही. अख्खा पाडाच सायंकाळनंतर चिमणी, कंदीलवर रात्रही काढतो. शेजारी दक्षिणेकडील अर्धा किलोमीटरवर गमजा भिल यांच्या घरापर्यंत वीज पोहोचली आहे. उत्तरेकडील भागाच्या शेतशिवारापर्यंत वीज आहे. मात्र, जांभाळीपाड्यालाच वीज मिळालेली नाही. 

ग्रामस्थांच्या नशिबी हालअपेष्टा
दळणासाठी जांभाळीपाडावासियांना दोन किलोमीटर पायी जावे लागते. एक ते दीड किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी पश्‍चिमेला वाज्या अंबा पाड्यात, तर अलालदरी परिसरातील हातपंपावर जावे लागते. मोबाईल चार्जिंगसाठी एक किलोमीटरवर विसपुडे येथे ग्रामस्थ जातात. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर तिथे शेतीसाठी पाण्याचा प्रश्‍न तर दूरच आहे. जांभाळीपाड्याच्या उत्तरेकडे जंगलाचा भाग असल्याने पावसाळ्यात भीतीचे वातावरण असते. बॅटरी, कंदील, चिमणीचा आधार घेत स्वसंरक्षण करावे लागते. 

घोषणेपासून पाडा दूरच 
सरासरी पाच ते सहा घरे मिळून विखुलेला हा पाडा ‘प्रकाशा’साठी कासावीस आहे. सर्वांगीण विकासासह शंभर टक्के जिल्हा अंधारमुक्त, असा दावा करणारी वीज कंपनी आणि देशातील सर्व खेडी अंधारमुक्त झाल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेपासून जांभाळीपाडा अद्याप दूरच आहे. या पाड्याच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नाबाबत चाळीस वर्षांपासून सरकारी यंत्रणेला पाझर का नाही फुटला? हा संशोधनाचा भाग आहे.  

मागणी प्रस्तावाकडे दुर्लक्षच 
आमळीच्या सरपंच सीमा तुळशीराम पिंपळे यांनी सांगितले, की वीज कंपनीच्या दहिवेल- साक्री कार्यालयात जांभाळीपाड्यात वीज सुविधा द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव समक्ष दिला. दोन वर्षे उलटली तरी वीज सुविधेपासून हा पाडा वंचितच आहे. 

मागणीची अद्याप दखल नाही
ग्रामस्थ रामा मोरे म्हणाले, जांभाळीपाड्यात चाळीस वर्षांपासून राहतो. तेव्हापासून वीज पाहिलेली नाही. सायंकाळनंतर परिसरात भीती वाटते. विविध स्तरावर वारंवार वीजसुविधेबाबत मागणी करूनही कुणीच अद्याप दखल घेतलेली नाही.

Web Title: jambhalipada village electricity facility issue