भाजपत गेलेले परतीच्या प्रवासाला..! : सुनील महाजन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सत्ता होती म्हणून गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यावेळी सत्तेत असलेल्या आघाडीतील नगरसेवक, पदाधिकारी भाजपत गेले. त्या आधारावर महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवीत सत्ताही काबीज केली. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडत आहे. गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपत मोठ्या प्रमाणात "इनकमिंग' झाल्यानंतर आता सत्तांतरानंतर पुन्हा ते नगरसेवक शिवसेनेत येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भाजपत गेलेले आमचे जुने सहकारी परतीच्या प्रवासाला लागल्याचा दावा केला आहे. 
सत्ता होती म्हणून गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यावेळी सत्तेत असलेल्या आघाडीतील नगरसेवक, पदाधिकारी भाजपत गेले. त्या आधारावर महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवीत सत्ताही काबीज केली. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, अनंत जोशी आदी उपस्थित होते. 
राज्याची सत्ता गेल्याने महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या एका मोठ्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या कारणांसाठी नगरसेवकांनी पक्षांतर केले होते यात पुढे आपापल्या प्रभागात विकासकामे कशी होणार, याबाबत त्यांच्यात चर्चा देखील सुरू आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानादेखील तसेच महापालिकेत गेल्या 14 महिन्यांपासून विकासकामे ठप्प आहेत. त्याबाबतचा राग देखील नगरसेवकांमध्ये असल्याचे महाजन यांनी सांगितले. 

फोडाफोडी करणार नाही 
महापालिकेत सत्ता असूनही शहराचा विकास खुंटला आहे. यामुळे सत्ताधारी नगरसेवकांचा मोठा गट अस्वस्थ झाला असून, पळालेली मुलं परतीच्या प्रवासात असून शिवसेना फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असून जनतेला मान्य असणारा निर्णय वेळेवर घेण्यात येणार असल्याचे अनंत जोशी म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jjalgaon muncipal corporation bjp nagarsevak come back sena