कालिदास कलामंदिरामुळे नाशिकला सांस्कृतिक ओळख : महाजन

दत्ता ठोंबरे
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नाशिक : शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती बांधून होत नाही तर शहराचा सांस्कृतिक विकास होणेही गरजेचे असते. नाशिकला कलावंतांची खाण आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून नवनवीन कलाकारांना वाव मिळेल आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहराची वेगळी ओळख निर्माण होईल, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

नाशिक : शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती बांधून होत नाही तर शहराचा सांस्कृतिक विकास होणेही गरजेचे असते. नाशिकला कलावंतांची खाण आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून नवनवीन कलाकारांना वाव मिळेल आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहराची वेगळी ओळख निर्माण होईल, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

शालिमार येथे आज स्मार्ट सिटी योजनेतून नुतणीकरण करण्यात आलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालनाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, नाट्य संमेलनाध्यक्ष किर्ती शिलेदार, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी, आयुक्त्त तुकाराम मुंढे, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, की स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. अनेक कामे सुरु आहेत. कामे सुरु करणे  ठीक असते त्याचे नियोजन महत्वाचे असते. नाट्यगृहाचे लोकार्पण झाले आता निगा राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

किर्ती शिलेदार म्हणाल्या,की कालिदास कलामंदिर हे सगळ्या कलावंताचे आवडते कलामंदिर आहे. आमची येथे अनेक नाटके रंगली. येथील नवीन लोकही प्रतिभेने काम करत आहेत. नाटक एक जिवंत कला आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा उत्सव असतो. असे उत्सव येथे वारंवार घडावेत.

श्री. कांबळी म्हणाले, की येथील नाटकाची वाटचाल समृद्ध आहे. नुतणीकरणानंतर देखभाल होणे आवश्यक आहे. रसिकांनी आपले घर समजून जपणूक करावी. कवी किशोर पाठक, सदानंद जोशी यांनी सुत्रसंचालन केले. शाहू खैरे यांनी आभार मानले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले, शाळेत असतांना मीही नाटकात काम केले आहे. त्याकाळी ग्रामीण भागात मुली नाटकात काम करत नसत. मी दिसायला बरा असल्याने मुलींच्या भूमिका मलाच दिल्या जायच्या. लहानपणी नाटकात काम  केल्याचा आता फायदा होतो आहे. कारण दिवसभरात अनेक भूमिका वठवाव्या लागतात. लग्न, दु:ख, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात.

Web Title: kalidas kalamandir lokarparn sohala