खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर 

अंकुश सोनवणे
बुधवार, 3 एप्रिल 2019

खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर 

खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर 

जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी गाण्याने "यू ट्यूब'वर धूम केली आहे. या गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर मिळाले आहेत. 
कुमावतने 2007 मध्ये इंजिनिअरिंग सोडून दिग्दर्शनाकडे पावले वळविली. "आरं दाजीबा' या अल्बमने आपल्या कामाला सुरवात केली. कालांतराने "हाय साली प्यार करना...', "लगनमा मचाडू धूम...' व गतवर्षी "सावन ना महीना मा तुला प्यार करना...' हे गाणे साकारले; तर गेल्या पाच दिवसांपूर्वी रिलिज झालेले "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' हे गाणे पाच दिवसांत चौदा लाख लोकांनी पाहिले. तसेच "टिक टॉक' व "व्हॉट्‌सऍप स्टेटस'लाही मोठ्या प्रमाणात शेअर झाले आहे. या गाण्याला लागणारा खर्च हा "यू ट्यूब'द्वारे मिळणाऱ्या पैशातून साकारला आहे. या गाण्यासाठी संजय सोनवणे, कृष्णा जोशी, बाळू वाघ, ऋषिकेश चौधरी, समाधान निकम, राहुल गुजर, अल्पेश कुमावत यांची मेहनत आहे. 

तरुणाईने घेतले डोक्‍यावर 
ग्रामीण भागातील कलाकारांना आपली कला दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो. पण सचिन कुमावत व त्यांचा चमू याला अपवाद ठरला आहे. दिग्दर्शक सचिन कुमावत यांनी संगीतमय व गायक अण्णा सुरवाडे यांनी गायिलेले "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' हे गाणे ध्वनिचित्र मुद्रित केले आहे. या गाण्याला पाच दिवसांत "यू ट्यूब'वर चौदा लाख लोकांनी बघितले. तसेच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. सध्या तरुणाईने या खानदेशी गाण्याला डोक्‍यावर घेतले आहे. 

ग्रामीण भाग मांडला गाण्यातून 
ग्रामीण भागातील कलाकारांनी एकत्र येत आपली कला व अहिराणी भाषा जोपासण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. या गाण्यात पूर्वी गावाकडे सायकलीवरून केसावर फुगे विकणारा जो आज समाजातून लुप्त झाला आहे त्याला दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणाई नोकरीच्या शोधात असताना स्वतःचा कुठलाही व्यवसाय सुरू करू शकतो. त्या कामाची लाज युवकांना वाटायला नको, हेही आपल्याला गाण्यात दिसते. 

खानदेशी गाण्यांची वाहिन्यांना "ऍलर्जी' 
खानदेशी गाणी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. पण त्यांना आजही मराठी संगीत वाहिन्यांवर जागा मिळत नाही किंबहुना त्यांना "ऍलर्जी' असल्याने निर्मात्यांची नाराजी आहे. "सावन ना महीना मा...' या गाण्याला चाळीस लाख लोकांनी पाहिले. मोठ्या प्रमाणात वरातीत हेच गाणे व्हायरल आहे. पण त्याला वाहिन्यांवर स्थान मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. 

अभियांत्रिकेचे शिक्षण सोडून या क्षेत्रात आलो. कारण याची मला आवड होती. सर्वसामान्य कुटुंबातून आल्याने परिस्थितीची जाणीव होती. सुरवातीच्या काळात संघर्ष केला. वेगवेगळे प्रयोग करून पाहिले व ते जनतेला आवडले. लवकरच आमचे मराठी गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अहिराणी गाण्यांना मानाचे स्थान मिळण्यासाठी प्रयत्न करू. 
- सचिन कुमावत, दिग्दर्शक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khandeshi ganyala 14 lakh vivhar