माफीपत्र नव्हे; त्यामागे सावरकरांची कुटनीती! 

माफीपत्र नव्हे; त्यामागे सावरकरांची कुटनीती! 

माफीपत्र नव्हे; त्यामागे सावरकरांची कुटनीती! 

जळगावः स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांनी इंग्रजांची माफी मागून सुटका केल्याचा आरोप केला जातो. त्यांनी निश्‍चितपणे माफीपत्र लिहिले. ही बाब स्वतः सावरकरांनीदेखील लपवली नाही. मुळात सावरकर हे दया मागणारे व्यक्‍तिमत्त्व नव्हते. अंदमानाच्या तुरुंगात असताना सावरकरांनी माफीपत्र लिहिले. मात्र, त्यामागे एक कुटनीती होती, ही बाजूदेखील समजून घेणे अपेक्षित असल्याचा सूर "स्वातंत्र्यवीर सावरकर- समज व गैरसमज' या विषयावरील परिसंवादातून उमटला. 
सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्थेतर्फे परिसंवाद घेण्यात आला. गंधे सभागृहात आयोजित परिसंवादात आशुतोष अडोणी (नागपूर), शुभा साठे (नागपूर), अक्षय जोग (पुणे), डॉ. नीरज देव (जळगाव) व श्‍याम देशपांडे (वर्धा) यांचा सहभाग होता. ऍड. सुशील अत्रे यांनी सूत्रसंचालन केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
सावरकर स्वातंत्र्यवीर नसून माफीवीर होते, यावर श्री. अडोणी म्हणाले, की सावरकर यांनी माफीपत्र नाही तर विनंतीपत्र लिहिले. कारण, ते दया मागणारे व्यक्‍तिमत्त्व नव्हते. त्यांच्यावर माफी मागण्याचा पहिला आरोप 1928 मध्ये कॉंग्रेस नेते गणेश शंकर विद्यार्थी यांनी केला. हा आरोप पलटवार म्हणून केला. सावरकरांची माफीपत्रावर सुटका झाली. पण, ब्रिटिश त्यांना सर्वांत मोठा शत्रू मानत आणि त्यांना सोडणे भयावह असल्याचा उल्लेख सावरकरांच्या पत्रावर ब्रिटिशांकडून झाल्याचे अडोणी म्हणाले. अक्षय जोग म्हणाले, की 1910 मध्ये सावरकर अंदमानात गेले असता वर्षभरात त्यांनी माफीपत्र लिहिले. कारण, 1914 च्या पहिल्या महायुद्धात सावरकरांना बाहेर पडायचे होते, म्हणून त्यांनी माफीपत्र लिहिल्याचे जोग म्हणाले. 
सामाजिक कार्यात सावरकरांच्या कुटुंबाचा वाटा किती? यावर शुभा साठे म्हणाल्या, की सावरकरांनी कुटुंबातील स्त्रियांना कार्याबाबत कधीच अनभिन्न ठेवले नाही. तिन्ही सावरकर बंधूंनी स्वातंत्र्यलढ्यासाठी होमकुंड पेटविला. यासाठी अज्ञात आणि अबोल असलेल्या तिन्हींच्या पत्नी होत्या. येसू, यमुना आणि शांताबाई या तिघींनी घरी येणाऱ्या क्रांतिकारकांच्या सुरक्षेचे प्रमुख काम केले. येसू आणि शांताबाई यांनी स्त्रियांना एकत्र करून राष्ट्रभक्‍तीचे धडे शिकविल्याचे त्या म्हणाल्या. सावरकर आस्तिक की नास्तिक यावर श्‍याम देशपांडे म्हणाले, की आस्तिक आणि नास्तिकता मोजपट्टीवर तपासता येणार नाही. सावरकरांनी आस्तिकतेचे पाऊल टाकताना कधीच तडजोड केली नाही. पूजाकर्माला अनुसरून आस्तिक आणि नास्तिकता ठरविता येते. असे असते तर पतित पावन मंदिराची स्थापना आणि त्यापूर्वी हनुमान मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्याचे काम सावरकरांनी केले नसते. सावरकरांच्या साहित्यावर डॉ. देव म्हणाले, की सावरकर आणि इतरांच्या साहित्यात फरक आहे. कारण, इतर जण साहित्य लिखाणातून आनंद मिळवितात, तर सावरकरांचे साहित्य विभक्‍त मनातून आले असल्याचे डॉ. देव म्हणाले. 


गांधी हत्या आणि सावरकर... 
ज्या लोकांच्या राजकीय वर्चस्वाला सावरकरांमुळे धोका होता, अशा हिंदुत्वविरोधकांनी सावरकरांना बदनाम करण्याचे षड्‌यंत्र आखून गांधी हत्येत सावरकरांचे नाव गोवले. हा आरोप घ्रृणास्पद आणि चुकीचा होता. यानंतर नेमलेल्या कपूर चौकशी आयोगाने कार्यकक्षा ओलांडून सावरकरांवर शिंतोडे उडविले. पण, गांधी हत्येच्या कटाची माहिती कॉंग्रेसचे मंत्री काकासाहेब गाडगीळ, मोरारजी देसाई यांच्यासह अकरा लोकांना होती. पण, त्यांच्यावर कुठलीही कारवाई आयोगाने केली नसल्याचे आशुतोष अडोणी आणि अक्षय जोग यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com