निसर्गाची अनुभूती अन्‌ वन विभागाला उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जळगाव  - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या उद्यानातून उत्पन्नाचा स्रोत म्हणून सदस्यत्व शुल्क आकारणी सुरू केली असून, वार्षिक सहाशेवर निसर्गप्रेमी या उद्यानाचे सदस्य झाले अाहेत. ते दररोज व्यायामासाठी उद्यानात हजेरी लावतात. या माध्यमातून उद्यानास वार्षिक १६ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. 

जळगाव  - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या उद्यानातून उत्पन्नाचा स्रोत म्हणून सदस्यत्व शुल्क आकारणी सुरू केली असून, वार्षिक सहाशेवर निसर्गप्रेमी या उद्यानाचे सदस्य झाले अाहेत. ते दररोज व्यायामासाठी उद्यानात हजेरी लावतात. या माध्यमातून उद्यानास वार्षिक १६ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. 

वन विभागाने मोहाडी रस्त्यावर लांडोरखोरी उद्यानाची निर्मिती केली आहे. जळगावातील नागरिकांसाठी व निसर्गाचा सान्निध्य हवा असणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. वनविभागानेच उद्यान विकसित केल्याने त्याच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारीही वन विभागावर आहे. त्यामुळे उद्यानाच्या माध्यमातून काही प्रमाणात उत्पन्न मिळावे म्हणून विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. उद्यानात मॉर्निंग वॉकसह इव्हिनिंग वॉक, व्यायामासाठी वन विभागाने निसर्गप्रेमींसाठी वार्षिक सदस्यत्व नोंदणी सुरू केली असून, सद्य:स्थितीत उद्यानाचे सहाशेवर वार्षिक सदस्य आहेत. 

उद्यानात सशुल्क प्रवेश
हे उद्यान सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ३ ते ६ यावेळेत सुरू असते. उद्यानाच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने वार्षिक व मासिक सदस्यत्व आकारले जाते. वार्षिक शुल्क पंधराशे रुपये व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक एक हजार तर मासिक शुल्क प्रत्येकी ४०० रुपये आहे.

प्रवेशासाठी प्रतिव्यक्ती २०, तर मुलांसाठी १० रुपये आकारले जातात. आगामी काळात उद्यानाचा विकास आणि जनजागृतीसोबतच उत्पन्न वाढण्याचा विश्‍वास अधिकारी व्यक्त करतात. उद्यानाबाबत फारशी जनजागृती न झाल्याने शहराबाहेर असल्यामुळे फार गर्दी होत नाही. शनिवारी, रविवार व सुटीच्या दिवशी उद्यानात चांगली गर्दी होते. दररोज गर्दी वाढावी म्हणून वन विभाग प्रयत्नशील आहे.

उद्यानात उपलब्ध सोयी-सुविधा 
 खुली व्यायाम शाळा 
 जॉगिंग ट्रॅक 
 जैवविविधता उद्यान 
 संकल्पना उद्यान 
 पूल 
 पॅगोडा 
 निरीक्षण मनोरे 
 लहान मुलासाठी खेळणी 
 निसर्ग माहिती केंद्र 
 पिण्याचे पाणी 

आकर्षित करण्यासाठी उद्यानात नवीन बदल 
उद्यानात नागरिकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे प्रकल्प तयार करण्याचे नियोजन आहे. यात नैसर्गिक पायवाटेद्वारे वनस्पती, झाडे, प्राणी आदी सर्व माहिती मिळेल. निसर्ग पर्यटन माहिती केंद्र उभारणी, फुलपाखरू पार्क, लहान मुलांसह मोठ्यांसाठी भुलभुलय्यासारखे प्रकल्प, उद्यानातील २ तलावात रंगीत मासे सोडणे असे प्रयोग करून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

उद्यानात ३० कर्मचारी
लांडोरखोरी उद्यानाची देखभाल ३० कर्मचाऱ्यांकडून होत आहे. उद्यानाच्या कारभार वन क्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील यांच्याकडे आहे. तर वनपाल पी. जे. सोनवणे, वनरक्षक सी. व्ही. पाटील यांच्याकडे या उद्यानाची देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landorkhori Udyan Nature Forest Department Income