उन्हातान्हात लाठी खात मिळवली बाटली ;तळीरामांनी लावल्या लांबच लांब रांगा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

शहरात विदेशी दारूसाठी एकूण दहा वाइनशॉप असून, त्यापैकी तीन आज बंद होते. गणेश कॉलनीतील एक, बेंडाळे चौकातील एक आणि अजिंठा चौकातील आर. के. वाइन्स अशी दुकाने बंद होती. उघडलेल्या दुकानाबाहेर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याने अक्षरशः रेटारेटी होऊन चित्रा चौकातील नीलम वाइनशॉपवर पोलिसांना सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवावी लागली.

जळगाव,  शहरात 45 दिवसांनंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कालच (ता. 4) वाइनशॉप उघडण्याची परवानगी दिली. त्यानुसार आज दुकाने उघडण्यापूर्वीच तळीरामांनी बाहेर रांगा लागून चक्क 44 अंश सेल्सिअस तापमानात रेटारेटी करून दारू मिळवली. काहींना पोलिसांचे दंडुकेही खावे लागले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागला. 

शहरात 45 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मद्याची चव चाखायला भेटणार असल्याने आज अगदी पहाटेपासून दुकानाबाहेर तळीरामांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. दुकाने उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या रांगा लागल्याने दुकानदारांनी पोलिसांना पाचारण करून विक्रीला सुरवात केली. 

तयारीनिशी विक्री 
दारू खरेदीसाठी गर्दी उसळणार असल्याचा अंदाज आल्याने दुकानदारांनी दुकानाबाहेर खांबाचे मजबूत बॅरिकेटस्‌ उभे केले होते. काहींनी ग्राहकांचे स्क्रिनिंग आणि सॅनिटायझर लावून स्वागत केले. तोंडावर मास्क लावणे बंधनकारक होते. मात्र गर्दीमुळे रेटारेटी झालीच आणि फिजिकल डिस्टन्सिंग मोडले गेल्याचे दिसून आले. 

दारूसाठी कायपण 
शहरात विदेशी दारूसाठी एकूण दहा वाइनशॉप असून, त्यापैकी तीन आज बंद होते. गणेश कॉलनीतील एक, बेंडाळे चौकातील एक आणि अजिंठा चौकातील आर. के. वाइन्स अशी दुकाने बंद होती. उघडलेल्या दुकानाबाहेर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याने अक्षरशः रेटारेटी होऊन चित्रा चौकातील नीलम वाइनशॉपवर पोलिसांना सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवावी लागली. दारूच्या दुकानांवर प्रत्येकालाच जास्तीची दारू खरेदी करायची असल्याने हातात काहींनी पिशव्या आणल्या होत्या, तर काहींनी दोन लिटरच्या मोठ्या बाटल्या हातातच सन्मानचिन्ह मिरवावे अशा पद्धतीने नेल्या. तरुणांसह महिलाही वाइनशॉपीच्या रांगेत उभ्या असल्याचे दिसून आले. 

रोजंदारीने मजूर उभे 
दारू दुकानांच्या बाहेर लागलेल्या रांगेचे कोणी फोटो काढत होते, तर काहींनी शूटिंगही केली. रांगेत आपण दिसू नये, म्हणून ओळखीच्या मजुरांना शंभर रुपये किंवा "तुझीपण घे', अशा वायद्यावर रांगेत उभे करून दारूची खरेदी काही ग्राहकांकडून करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lathicharg at jalgaon on alccohol shop

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: