"या" चिमुकल्यांनी केली अशी काही कामगिरी...

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

सध्या पावसाळ्यात गावागावात विविध जीवघेण्या आजारांचे साम्राज्य पसरलेले आहे. डास व मच्छरांमुळे घराघरातून रुग्ण पहावयास मिळत आहेत. यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची सुद्धा आजारपणामुळे शाळेला दांडी असते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक अनोखी शक्कल लढवत ‘एक पाउल स्वच्छतेकडे’ हे अभियान राबवण्याची सुरुवात केली असून स्वच्छ व निर्मळ निसर्गाची निर्मिती आपल्या घरापासून व शाळेपासून राबवून समाजाला एक नवी दिशा दिली आहे.

नाशिक : मोरेनगर (ता.बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावात पसरलेल्या साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ हे अभियान सुरू केले आहे. चिमुकल्यांनी मोरेनगर गावासह संपूर्ण सटाणा शहरात कचऱ्याचे व्यवस्थापन नाविन्यपूर्ण पद्धतीने करून समाजापुढे स्वतःच्या अनुकरणाने एक नवा आशेचा किरण जागा केला आहे.

तर असा राबविला उपक्रम..
दवाखान्यातील रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक, मित्र मंडळी नारळपाणी घेऊन येतात. मात्र हे रिकामे झालेली शहाळे डेंग्युच्या डासांचे माहेरघर बनतात. नेमक्या या सहज महत्व नसलेल्या बाबीचा विचार या मुलांनी केला आणि त्यावर व्यापक स्वरुपात अभियान राबवण्याचे नियोजन त्यांनीच गटचर्चा करून केले. गावातील तसेच सटाणा शहरच्या शेजारील चौगाव बर्डी जवळच्या कचऱ्याच्या ठिकाणी, शहरातील दवाखान्यात जावून कचऱ्यात जमा झालेली शहाळे शाळेत आणली. त्यात शेतातील माती भरून एक रोपटे लावून प्रत्येक मुलांनी आपल्या शाळेत, घराजवळ, शेतात झाडे लावली. दवाखान्यात जावून रुग्णाच्या नातेवाईकांना ही झाडे लावण्यास प्रवृत्त केले. बस स्टँडवरील फळ विक्रेत्या व ग्राहकांनाही झाडांची रोपे भेट देऊन कचऱ्याचे निर्मुलन, डेंग्यु डासांची उत्पत्ती कमी होऊन नवीन सुंदर हिरवळीच्या रूपाने निर्मळ निसर्गाच्या निर्मितीची किमया या विद्यार्थ्यानी केली आहे.

संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही हा उपक्रम राबवावा;  गटशिक्षणाधिकारींना निवेदन

हा उपक्रम राबवून यशस्वी केला असून संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही सदर उपक्रम राबवावा यासाठी मोरेनगरच्या मुलांनी थेट बागलाणचे गटशिक्षणाधिकारी टी.के.घोंगडे, केंद्रप्रमुख एम.एस.भामरे यांना निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे बागलाण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत कापडणीस व डॉ.पंकज शिवदे यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या व्यापक समाजोपयोगी उपक्रमास शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार, मुख्याध्यापक नारायण सोनवणे, भिकुबाई कापडणीस, प्रतिभा अहिरे, वैशाली पवार यांनी मार्गदर्शन केले आहे. 

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस
राष्ट्रपती आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांच्या मार्गदर्शनातून शाळेतर्फे सातत्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास वाढीस लागला आहे. सध्या पावसाळ्यात गावागावात विविध जीवघेण्या आजारांचे साम्राज्य पसरलेले दिसत असून डास व मच्छरांमुळे घराघरातून रुग्ण पहावयास मिळत आहेत. यामुळे बऱ्याच वेळा शाळेतील विद्यार्थ्यांची सुद्धा आजारपणामुळे शाळेला दांडी असते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक अनोखी शक्कल लढवत ‘एक पाउल स्वच्छतेकडे’ हे अभियान राबवण्याची सुरुवात केली असून स्वच्छ व निर्मळ निसर्गाची निर्मिती आपल्या घरापासून शाळेपासून राबवून समाजाला एक नवी दिशा दिली आहे.

प्रतिक्रिया

मोरेनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी निकोप समाजनिर्मितीसाठी यशस्वीपणे राबवलेला हा उपक्रम आहे. त्यामुळे अस्वच्छता दूर होऊन डेंग्यु, मलेरिया असे साथीचे जीवघेणे आजार नष्ट होऊन गाव आणि शहर स्वच्छ होण्यासाठी ‘डिजाईन फॉर चेंज’ या उपक्रमातून हा उपक्रम जागतिक दर्जा गाठू शकतो, असा नक्कीच आशावाद वाटतो. - डॉ.वैशाली वीर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little students doing clean campaign for nature