Vidhan Sabha 2019 : नंदुरबार जिल्हा : युती मजबूत, महाआघाडी पोरकी

बळवंत बोरसे
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शिवबंधन बांधल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावितांनी उमेदवारी नाकारल्याने पक्षाचाच राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नेताहीन झाली. 

काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शिवबंधन बांधल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावितांनी उमेदवारी नाकारल्याने पक्षाचाच राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नेताहीन झाली. 

आदिवासीबहुल नंदुरबारची ओळख काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच आतापर्यंत होती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या काँग्रेसच्या प्रचाराची सुरवात येथूनच व्हायची, एवढे काँग्रेसचे जिल्ह्यावर प्रेम होते. मात्र, भाजपच्या झंझावातात काँग्रेसचे जिल्ह्यातील एकेक बुरूज ढासळले. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या दिग्गजांनी सत्ताधारी भाजचा पर्याय निवडला.

भाजपने संघटनावर भर दिला, काँग्रेसमधील दिग्गजांना प्रवेश दिले. काँग्रेसच्या राज्य अथवा केंद्रीय नेतृत्वाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. जिल्ह्यात विधानसभेचे सर्व चारही मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. नंदुरबार, नवापूर आणि शहादा भाजपच्या; तर अक्राणी शिवसेनेच्या वाट्याला आलाय. महाआघाडीत चारही मतदारंसघ काँग्रेसच्या वाट्याला आलेत. शहादा राष्ट्रवादीसाठी सोडावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी केली होती; त्याकडे राष्ट्रवादीने लक्ष न दिल्याने त्यांनी पक्षाचाच राजीनामा दिला. उर्वरित तीनपैकी नवापूरमधून माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र शिरीषकुमार, अक्राणीमधून आमदार के. सी. पाडवी, शहाद्यातून माजी मंत्री पद्माकर वळवी रिंगणात आहेत. रघुवंशी शिवसेनेत गेल्याने नंदुरबारमध्ये काँग्रेससमोर उमेदवारीचा प्रश्न होता. शहाद्यातून भाजपने उमेदवारी नाकारलेले आमदार उदेसिंग पाडवींना काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली. भाजपचे मातब्बर नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधातील लढाईत रंग भरणार आहे.

भाजपची रणनीती यशस्वी
काँग्रेसचे नेते, माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नवापूरमध्ये काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक यांना आव्हान दिले आहे. एरवी एकगठ्ठा असलेल्या काँग्रेसच्या मतांची विभागणी होणार आहे. सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यामुळे भाजपचे मताधिक्‍य वाढणार आहे. नंदुरबार हा पक्ष नव्हे, तर डॉ. विजयकुमार गावित यांचाच बालेकिल्ला आहे. ते ज्या पक्षात तोच जिल्ह्याचा पक्ष, हा इतिहास १९९५ पासून आजतागायत कायम आहे.

शिवसेना खाते उघडण्यास उत्सुक
अक्कलकुवा शिवसेनेसाठी सोडलाय. काँग्रेसच्या चंद्रकांत रघुवंशींमुळे शिवसेनेला ही जागा मिळाली. भाजपने उमेदवारी नाकारल्याने नागेश पाडवी अपक्ष रिंगणात आहेत. भाजपने शहादा आणि नवापूरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. शहाद्यातून उमेदवारी नाकारलेले उदेसिंग पाडवी रिंगणात नसले, तरी ते नंदुरबारमधून खुद्द माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधातच लढत आहेत. त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक थोडी रंगतदार होईल. शहाद्यातून नवख्या राजेश पाडवींना अनुभवी पद्माकर वळवींना तोंड द्यावे लागेल. भाजपसाठी चिंतेची बाब नवापूरमध्ये असू शकते. तेथे माजी आमदार शरद गावित काँग्रेस आणि भाजपच्या मतविभागणीचा फायदा घेऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Nandurbar District Yuti Mahaaghadi Politics