Vidhan Sabha 2019 : नाशिक जिल्हा : महायुतीसमोर नाराजी रोखण्याचे आव्हान

Nashik-District
Nashik-District

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जंगी सभेने नाशिकच्या भूमीरून रणशिंग फुंकत पालकमंत्री गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४५ जागा जिंकण्याचा दावा ठोकलाय. शिवबंधनातून शिवसेनेने आपली रणभूमी घट्ट केली आहे. महायुतीची व्यूहरचना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना घेरण्याची असली, तरी महायुतीला नाराजीचे ग्रहण आहे. ‘मनसे’ने नाशिकमध्ये तीन आणि इगतपुरीत उमेदवार दिले आहेत.

‘इनकमिंग’च्या लाटेने महायुतीला जिल्ह्यात फारसे काही दिलेले नाही. नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्य आणि देवळाली, मालेगाव मध्य शहरी तर उर्वरित जिल्हा ग्रामीण अन्‌ आदिवासीबहुल आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादीने प्रत्येकी चार; तर काँग्रेसने दोन आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक जागा मिळवली होती. या वेळी जिल्ह्याचे राजकारण वेगाने बदलले. भाजपने उमेदवार देताना ‘वेटिंग’चे सत्र अवलंबल्याने नाशिकमध्ये भाजपसह शिवसेनेत नाराजी उफाळली.

जिल्ह्याच्या राजकारणातल्या नाराजीच्या ठिणगीचा वणवा होणार नाही, याची दक्षता महायुती घेताना दिसत नाही. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमधून काँग्रेसची आमदारकी सोडून शिवबंधन बांधलेल्या निर्मलाताई गावितांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्याचवेळी काँग्रेसमधील उमेदवारीची पोकळी भरण्यासाठी राष्ट्रवादीने आपले जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकरांना काँग्रेसमध्ये धाडत उमेदवारी मिळवून दिली. ‘मनसे’ने योगेश शेवरेंना उमेदवारी दिली. हे घडतानाच महायुतीतील माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आणि शिवराम झोले यांनी पत्ते खोलले नाहीत.

पक्षांतरातून उमेदवारी मिळवली
नाशिक शहर आणि जिल्ह्यात पक्षांतर करून अर्धा डझन जणांनी उमेदवारी मिळवली. यात भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेशणारे माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत स्वगृही, शिवसेनेत परतलेले माजी आमदार धनराज महाले, राष्ट्रवादीतून बाहेर पडत ‘एमआयएम’च्या पहिल्या यादीत स्थान मिळवणारे मौलाना मुफ्ती महम्मद इस्माईल यांचा समावेश आहे. २०१४ सारखीच ॲड. कोकाटेंची सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजेंशी, महालेंची दिंडोरी-पेठचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, तर मौलानांची मालेगाव मध्यमधून काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्याशी लढत होईल. दिंडोरी-पेठचे माजी आमदार रामदास चारोस्करांनी शिवबंधन बांधले, तरीही ते नाराज आहेत. हीच अवस्था शिवसेनेच्या भास्कर गावितांची आहे.

येवल्यातून छगन भुजबळांविरोधात शिवसेनेने पुन्हा संभाजी पवारांना उमेदवारी दिली. येथून शिवसेनेकडून इच्छुक माजी आमदार कल्याणराव पाटील, रूपचंद भागवतांच्या समर्थकांचे मन वळविण्याचे आव्हान आहे. नांदगावमधून राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यात लढत होईल. इथून भाजपतर्फे जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार इच्छुक आहेत. त्यांची नाराजी भोवणार की नाही, याची उत्सुकता आहे. चांदवड-देवळामधून विशेषतः भाजपच्या उमेदवारीसाठी प्रांतवाद उफाळला होता. भाजपने अखेर आमदार डॉ. राहुल आहेरांना पुन्हा संधी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने माजी आमदार शिरीष कोतवालांना पसंती दिल्याने लढत चुरशीची होईल.

निफाडमधून शिवसेनेने आमदार अनिल कदमांवर शिक्कामोर्तब केल्याने त्यांची राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्याशी नेहमीप्रमाणे लढत होईल. कदमांचे चुलत बंधू यतीन यांनी सभेद्वारे शक्तिप्रदर्शनाने रणशिंग फुंकल्याने ते कुणाच्या पथ्यावर पडणार, याबद्दल उत्सुकता असेल.

दादा भुसेंना काँग्रेसचे आव्हान
मालेगाव बाह्यमधून शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मोट बांधत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळेंना रिंगणात उतरवलेय. बागलाणमधून राष्ट्रवादीने आमदार दीपिका चव्हाणांनाच पुन्हा रणांगणात उतरविण्याचे ठरविलेले असताना भाजपने माजी आमदार दिलीप बोरसेंना पसंती दिली. आता भाजपला अंतर्गत धुसफुस आवरावी लागेल. कळवण-सुरगाणामधून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावित, राष्ट्रवादीचे नितीन पवार आणि शिवसेनेचे मोहन गांगुर्डे अशी तिरंगी लढत होईल. येथील राजकारण निकालाला कलाटणी देईल, असे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com