Makar Sankranti : मकरसंक्रांतीआधी नायलॉन मांजा घेताय? सावध राहा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manja

Makar Sankranti : मकरसंक्रांतीआधी नायलॉन मांजा घेताय? सावध राहा...

वडाळी : मकरसंक्रांतीला आणखी एक महिना वेळ असला, तरी डिसेंबरची चाहूल लागताच पतंगांचा मोसम सुरू झाला आहे. त्यासोबतच पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे होणारे अपघातही होऊ लागले आहेत.

बंदी असलेला नायलॉन मांजा बाजारात खुलेआम विक्री होत असल्याने पशु-पक्ष्यांसोबत दुचाकीचालकांसाठीही घातक ठरणार आहे. त्यामुळे पुढील एक- दोन महिने वाहन चालविताना जरा सांभाळूनच चालवावे, पतंग उडविण्याचा मोह लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. हा मोह त्यांना टाळताही येत नाही.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

मात्र शहरी व ग्रामीण भागात महावितरणाच्या लघु व उच्चदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडविताना किंवा कापलेले पतंग वीजतारांवर किंवा खांबांवर अडकतात, अशा वेळी तो अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नात अनेकदा जिवंत वीजतारेला स्पर्श होण्याची शक्यता असल्याने अडकलेला पतंग काढण्याचा मोह जिवावर बेतू शकतो.

हेही वाचा: Nandurbar News : नवापूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडंच नाहीत; पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून, त्याला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडवताना पुरेपूर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होण्याचा, प्रसंगी जीवितहानी होऊन अपघात होण्याचा धोका असतो तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो.

सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध झाला आहे, हा मांजा वीजप्रवाही तारांच्या किंवा रोहित्र वा महावितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन प्राणघातक अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Nandurbar News : उत्पन्न वर्षभराच्या पगाराहून अधिक; तरीही मुली म्हणतात, ‘शेतकरी मुलगा नको गं बाई!’

वाहनचालकांनाही धोका

धातूमिश्रित नायलॉन मांजामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांच्या गळ्यात अडकून अनेकदा इजा होण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातच अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. असे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे पालकांना मुलांना पतंग उडविण्यासाठी मांजा घेऊन देताना व मुले पतंग उडवीत असताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही अपघात होण्यापूर्वी तो होऊच नाही यासाठी काळजी घेतलेली कधीही योग्यच असते.

''मकरसंक्रांतीच्या सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. बाजूच्या गुजरात राज्यात मकरसंक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातदेखील पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मांजा खरेदी करताना बंदी असलेला नायलॉनच्या मांजाची मोठी मागणी असते. सण साजरे करताना आपल्यासोबत इतरांसह आपली व पशु-पक्ष्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.'' -मनोज माळी, निसर्गमित्र, सर्पमित्र, वडाळी, ता. शहादा

हेही वाचा: Karnataka Farmer : ‘२५ हजाराचा कांदा विकण्यासाठी ४१५ किमीचा प्रवास केला अन् मिळाले फक्त...!