‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

जळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार यांना जळगाव जिल्ह्यातील खंडणी प्रकरण भोवले. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी ठरविताना न्यायाधीशांनी ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय विसरलात लोहार..’ असे म्हणत पोलिस दलाच्या ब्रीदाची आठवण करून दिली. 

जळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार यांना जळगाव जिल्ह्यातील खंडणी प्रकरण भोवले. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी ठरविताना न्यायाधीशांनी ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय विसरलात लोहार..’ असे म्हणत पोलिस दलाच्या ब्रीदाची आठवण करून दिली. 

जिल्हा- सत्र न्यायालयात नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या खंडणी प्रकरणात मनोज लोहारसह धीरज येवले याला आज दोषी ठरविण्यात आले. न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात गेल्या तारखेलाच खटल्याचे कामकाज पूर्ण होऊन दोष निश्‍चितीचे कामकाज आज ठेवण्यात आले होते. 

न्यायालयात असे होते दृष्य
दुपारी साडेतीनला पुकारा होऊन मनोज लोहार, धीरज येवले, उपनिरीक्षक विश्‍वासराव निंबाळकर, तिघेही खाली मान करीत न्यायालयासमक्ष हजर झाले. साध्या वेशात ‘सॅल्यूट’ करीत दोन्ही हात मागे घेत सावधान मुद्रेत लोहार उभे राहिले. शेजारी धीरज येवले, बाजूला विश्‍वासराव निंबाळकर असे तिघेही हजर झाले. न्यायालयात सरकारी पक्षासह, बचावपक्ष आणि फिर्यादीचे वकील हजर असताना न्यायाधीश लाडेकर यांनी ‘सदरक्षणाय्‌ खलनिग्रहणाय’ या पोलिसदलाच्या ब्रीदाने दोष निश्‍चितीस सुरवात केली. 

महाजनांना डांबणे महागात
डॉ. उत्तमराव महाजन घटनेच्या दिवशी ३० जून २००९ ला मालेगाव येथे काँग्रेस मेळाव्यास जाण्याच्या तयारीत असताना चाळीसगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विश्‍वासराव निंबाळकर त्यांच्याकडे आले. तुम्हाला ॲडिशनल एसपी लोहार साहेबांनी बोलावल्याचे सांगत डॉ. महाजन यांना सोबत घेऊन गेले. लोहार यांच्या कार्यालयात आल्यावर सुरत येथील कॉन्ट्रॅक्‍टर पुरुषोत्तम पटेल व मनुभाई यांनी महाविद्यालयाचे बांधकामाचे काम करुनही दोन वर्षांपासून तुम्ही त्यांचे पैसे दिले नसल्याची तक्रार आली आहे, असे म्हणत डॉ. महाजन यांना दमदाटी करून ६० लाखांची खंडणी मागितली. चर्चेअंती तडजोड होऊन प्रकरण २५ लाखांवर आले. 

रस्तोगींची भूमिका निर्णायक 
डॉ. महाजन यांचा मुलगा मनोजने पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांना फोन करून घटना सांगितली. रस्तोगींनी निंबाळकरच्या मोबाईलवर फोन करून डांबून ठेवलेल्या महाजनांशी बोलणे केले. तीन दिवस रस्तोगी यांनी चाळीसगावात तळ ठोकून ३० लोकांचे जाबजबाब घेतले. तसा अहवाल महासंचालकांना पाठवला. तरी गुन्हा दाखल होत नाही म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. मात्र, तत्पूर्वीच महासंचालकांच्या आदेशान्वये चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल होऊन तपास जळगाव सीआयडीकडे सोपवण्यात आला.   

तीन वेळा दोषारोपपत्रे 
दाखल गुन्ह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) तत्कालीन उपअधीक्षक एम. जी. काळे यांनी तपास पूर्ण करून ७ जून २०१२ ला धीरज येवलेविरुद्ध दोषारोप दाखल केले. त्यानंतर १९ जून २०१२ ला उपनिरीक्षक विश्‍वास निंबाळकर यांच्यावर दोषारोप दाखल झाले आणि शेवटी चार वर्षांनंतर सीआयडीचे तत्कालीन डीवायएसपी सुनील गायकवाड यांनी २० ऑगस्ट २०१३ ला लोहार यांच्याविरुद्ध तिसरे दोषारोप सादर केले.

महत्त्वाचे साक्षीदार ठरले
दाखल खटल्यात फिर्यादी डॉ. उत्तमराव महाजन, नितीन जाधव, अनिल देशमुख (पोलिस), जगन्नाथ महाजन, गोकूळ सोनवणे, विजय पाटील, सोमनाथ मराठे, अनिल पाटील, डिगंबर माळी, निरीक्षक जगदेव आखरे, मसाजी काळे (डीवायएसपी), एसपी संतोष रस्तोगी, डीवायएसपी सुनील गायकवाड, आर. एन. देशमुख, सीआयडी अप्पर अधीक्षक नितीन मिटकर यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. बचाव पक्षाने बबलू विजय रॉय आणि श्‍यामराव चौधरी या दोघांना साक्षीदार म्हणून प्रस्तुत केले.

वादग्रस्त कारकिर्दीचे धनी लोहार
जळगाव : माजी वायरलेस डीजी पी. टी. लोहार यांचे पुत्र मनोज लोहार डीवायएसपी म्हणून जळगावात कार्यरत झाले. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी कार्यकाळ गाजवला खरा.. मात्र चुकीच्या ठिकाणी हात घातला आणि एकनाथराव खडसेंशी ‘पंगा’ घेतल्यानंतर त्याच्या भरतीचे, परीक्षाच गैरप्रकाराने उत्तीर्ण झाल्याचे प्रकरण गाजले. मनोज, नितीन आणि सुनील अशा तिघा भावांना त्यावेळी निलंबित व्हावे लागले. नंतर जातीचे बोगस दाखल्याचे प्रकरण निघाले. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रदीर्घ लढाईनंतर पुनश्‍च खात्यात आल्यावर चाळीसगाव अप्पर अधीक्षकपदाचा पदभार घेणे घोडचूक ठरली. त्यात संतोष रस्तोगी पोलिस अधीक्षक असताना डॉ. उत्तमराव महाजन यांना डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन पुन्हा निलंबन, कारागृह न्यायालयात खेटे मारतानाच लोहार यांना कर्करोगाने पछाडले. आणि सध्या होमगार्ड मुख्यालयात पोलिस अधीक्षक पदावर असताना आज जळगाव न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले.

अशी कलमे
३४२ -  अधिकाराविना  डांबून ठेवणे 
३४६  - खंडणी देण्यास  बाध्य करणे
३४८  - खंडणीसाठी वारंवार धमकावणे
३६४(अ)  - अपहरण करून खंडणीसाठी डांबणे 
३८५ - खंडणी उकळण्यासाठी जिवाची भीती घालणे
१६६ - सरकारी कर्मचाऱ्याने गैरउद्देशाने वागणे
५०४ - अशांतता माजविण्याच्या उद्देशाने अपमान करणे
५०६- ठार मारण्याची  धमकी देणे

डांबून ठेवल्याचे ते दोन दिवस कधीच विसरता येणार नाही. जो त्रास झाला ते शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. रस्तोगींसारखे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होते म्हणून मी आज जिवंत आहे. न्यायदेवतेप्रती माझा विश्‍वास सार्थ ठरला आहे. 
- डॉ. उत्तमराव महाज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Lohar Ransom case