अरेच्चा पुन्हा मद्यतस्करी......चक्क मिनरल वॉटरच्या खोक्‍यांमध्ये  "बंफर' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

शनिवारच्या रात्री रात्रगस्तीवर असताना नेरीनाका स्मशानभूमीकडून शहरात येणाऱ्या इंडिका कारवर (एमएच 19, एएस 6608) संशय गेल्याने ससे यांच्या वाहनाने तिचा पाठलाग केला. संशयिताने सुसाट कार पळवत नेली.

जळगाव : शहरातील अजिंठा चौकात असलेल्या "आर. के. वाइन'वरील कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा दारू तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी काल मध्यरात्री इंडिका कारमधून जवळपास एक लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी पाठलाग करून कार अडवली. मात्र, चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला. विशेष म्हणजे, तस्करांनी मिनरल वॉटरच्या खोक्‍यांमध्ये विदेशी दारू भरल्याचे आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

"आर. के. वाइन'च्या प्रकरणामुळे पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. राज्यभर गाजत असलेल्या मद्यतस्करीच्या प्रकरणासारखाच प्रकार काल रात्री घडला. शनिपेठ पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे एमआयडीसी पोलिस ठाण्याचा पदभार आहे. शनिवारच्या रात्री रात्रगस्तीवर असताना नेरीनाका स्मशानभूमीकडून शहरात येणाऱ्या इंडिका कारवर (एमएच 19, एएस 6608) संशय गेल्याने ससे यांच्या वाहनाने तिचा पाठलाग केला. संशयिताने सुसाट कार पळवत नेली. नेरीनाकाकडून पांडे डेअरी चौक, तेथून जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने सुसाट वेगात ही कार जात होती. कार जिल्हा रुग्णालयाकडून थेट दीक्षितवाडीच्या बोळीमध्ये शिरली. तेथून एमएसईबी कार्यालयाच्या रस्त्याने मटण मार्केटकडे येताना रस्त्यावर झोपलेल्यांमुळे कार जावू न शकल्याने चालकाने कार सोडून पळ काढला. 

कार उघडताच दारूचे घबाड 
निरीक्षक विठ्ठल ससे, सुरेश पाटील, अखलाख शेख असे कारजवळ पोचल्यावर कारमध्ये कोणीही नव्हते. कारची झडती घेतल्यावर त्यात पोत्यामध्ये विदेशी दारूच्या 35 ब्रॅण्डच्या सर्व प्रकारातील बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी ढकलतच ही गाडी पोलिस ठाण्यात आणली. विदेशी ब्रॅण्डच्या "रम विस्की'चे सर्व प्रकारातील बाटल्यांचा एकूण 80 हजारांचा हा माल होता. 

पोत्यांमध्ये कोंबला दारुसाठा 
कारमध्ये पोत्यात कोंबलेल्या दारूच्या बाटल्यांसोबतच मिनरल वॉटरचे तीन खोके आढळून आले. पोलिसांनी खोके उघडल्यावर त्यात प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये प्रत्येकी एक लिटर विदेशी दारू भरण्यात आलेली होती. अशा 35 लिटर दारू होती. कमी जागेत माल नेता यावा, यासाठी एक लिटर दारूचे बंफर या भामट्यांनी पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरले असण्याची शक्‍यता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mararthi news jalgaon Alcohol "Bumpers" in mineral water containers