esakal | सातपुड्याचा महू वृक्ष कोरोनावर गुणकारी
sakal

बोलून बातमी शोधा

corona reserch paper

सातपुड्याचा महू वृक्ष कोरोनावर गुणकारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

साक्री (धुळे) : आदिवासी बांधवांसाठी कल्पवृक्ष (kalpruksh) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महूवृक्षाच्या फुलांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणारा घटक असल्याचा दावा निजामपूर येथील जे. के. शाह आदर्श महाविद्यालय समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी आपल्या ‘महुवृक्षाचे संवर्धन व आदिवासींचे स्वावलंबन’ या शोध प्रबंधात केला आहे. सदर शोधप्रबंध त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठकडे (university) सादर केला आहे. (cucumber on satpudya mhow tree Corona)

कोरोनावर प्रभावी उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील असून, अद्याप खात्रीशीर उपाय संशोधकांना हाती लागलेला नाही. मात्र महू वृक्षाच्या फुलांमध्ये कोरोना रुग्णास बरे करण्याची ताकद आहे. दुधासोबत महूच्या पाच-दहा फुलांचे सेवन केल्यास एका आठवड्यात रुग्ण बरा होऊ शकतो, असा दावा डॉ. जाधव यांनी आपल्या संशोधनात केला आहे. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार राज्यात या फुलांचा उपयोग संबंधित रुग्णांसाठी केला जात आहे व रुग्ण बरे झाल्याचा अनुभव तेथील आदिवासींना आल्याचे त्यांनी म्हटले आहे. महू फुलापासून केलेल्या सॅनिटायझरचा वापर आज संपूर्ण देशात होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने या फुलांपासून औषध निर्मितीस मान्यता द्यावी, यावर अधिक संशोधन होण्याची गरज असून महू फुल प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन द्यावे, नामशेष होणाऱ्या महुच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

महू मूळ भारताचा..

महू वृक्ष हा सेपोपोर्टसी कुळातील आहे. त्याचे समाजशास्त्रीय नाव ‘मधूका’ किंवा ‘लाँगोफोलिया’ आहे. हा मूळ भारतातील वृक्ष आहे. सातपुडा, निलगिरी पर्वतापासून हिमालय पर्वताच्या शिवालिक पर्वतरांगांतपर्यंत असलेल्या पानझडी वनांमध्ये महू आढळतो. देशातील छत्तीसगड, उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये महू वृक्षाचे अस्तित्व आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे सध्या तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

अनेक आजारांवर गुणकारी..

महू हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. याची फुले, पाने, तसेच साल यात आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहेत. महू फुलांचा केवळ मद्यनिर्मितीसाठी उपयोग होतो असे नाही तर खोकला, ब्राँकायटीस, हिरड्यांवरील सूज, दातांचे विकार, पायरिया, मुखशुद्धी, दुग्ध ग्रंथींचा विकास, संधिवात, मुळव्याध, खाज-खरुज आणि त्वचारोग या आजारांवर महू फुले, पाने आणि तेलाचा उपयोग केला जातो. यासोबतच खरारा करणे, बर्फी तयार करणे, साबण निर्मिती व इथेनॉल निर्मितीसाठी उपयोग केला जातो. महुच्या फळांपासून (टोळंबी) तेलाची निर्मिती होते. या तेलाचा खाद्यपदार्थ म्हणून उपयोग होतो. सालीपासून चूर्ण तयार केले जाते त्याचा मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, जखम बरी करण्यासाठी त्वचा विकारासाठी उपयोग केला जातो.

शासनाने कोरोनावर उपयुक्त असणाऱ्या या वृक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी मार्गदर्शक सूचना केल्या पाहिजेत. महु प्रक्रिया उद्योगांना कायदेशीर मान्यता व प्रोत्साहन दिले पाहिजे. ऊस, द्राक्षे, संत्री, आंबा व काजू उद्योगात महू उद्योगांचा समावेश केला पाहिजे. निसर्ग उपचार पद्धतीत महूचा समावेश करून उत्पादनावरील निर्बंध उठविल्यास आदिवासींचे स्वावलंबन नक्कीच होईल.

- प्रा. डॉ. सुधाकर जाधव, संशोधक