esakal | मे, जूनमध्ये रेशन धान्याचे मोफत वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

ration

मे, जूनमध्ये रेशन धान्याचे मोफत वाटप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

धुळे : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यासह जिल्ह्यात १५ मेपर्यंत लॉकडाउन, (Lockdown) तर देशात विविध निर्बंध लागू आहेत. या कालावधीत गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने एप्रिल किंवा मे, तर केंद्र शासनाने मे व जूनमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्हा पुरवठा विभागाने ही माहिती दिली. (dhule news free ration dhanya distribution)

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मेमध्ये मोफत धान्य दिले जाईल. तसेच गेल्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत शिल्लक डाळ मेमध्ये अंत्योदय कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दिली जाईल. अंत्योदयच्या लाभार्थ्यांना वाटपानंतर शिल्लक डाळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे. पंतप्रधान योजनेंतर्गत केंद्र शासनाने मे व जूनसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत दिले जाणार आहे. अंत्योदय कार्डधारकास प्रतिकार्ड एक किलो साखर वीस रुपये दराने दिली जाईल. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचा अंगठा प्रमाणित करून ई-पॉस मशिनवर धान्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे मोफत धान्य प्राप्त करून घ्यावे. तसेच धान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध न झाल्यास संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले.

..असे होईल रेशन धान्याचे वितरण

मेमधील लाभार्थ्यांची संख्या अशी ः अंत्योदय अन्न योजना- शिधापत्रिकाधारक ७६ हजार ९७६, लाभार्थी- ३,८०,५५८, गहू- १,७१९ टन, तांदूळ- ९२० टन, गहू- २३ किलो प्रतिशिधापत्रिकाधारक, तांदूळ १२ किलो प्रतिशिधापत्रिकाधारक, प्राधान्य कुटुंब लाभार्थी- शिधापत्रिकाधारक- २,२१,६६७, लाभार्थी- ११,४८,८१५, गहू- २,२५८ टन, तांदूळ- ३,४११ टन, गहू दोन किलो प्रतिव्यक्ती, तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती, पंतप्रधान गरीब कल्याण योजना- शिधापत्रिकाधारक- २,९७,२२७, लाभार्थी- १५,०६,२३६, गहू- ३,०२५ टन, तांदूळ- ४,५३७ टन, गहू दोन किलो प्रतिव्यक्ती, तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती (साखर वगळता सर्व मोफत), जूनमध्ये याप्रमाणे स्थिती असेल. मात्र अंत्योदय योजनेंतर्गत गहू दोन रुपये प्रती किलो, एक रुपये प्रतिकिलोने भरड धान्य, तांदूळ तीन रुपये प्रती किलो, प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना गहू दोन रुपये प्रती किलो, एक रुपये प्रती किलोने भरड धान्य, तांदूळ तीन रुपये प्रती किलो दराने दिला जाईल, तर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य दिले जाईल.

loading image