esakal | लष्‍करात अधिकारी होण्याचे स्‍वप्न..‘ब्रिगेडियर’ होवून स्‍वप्न साकार

बोलून बातमी शोधा

brigadier in the army
लष्‍करात अधिकारी होण्याचे स्‍वप्न..‘ब्रिगेडियर’ होवून स्‍वप्न साकार
sakal_logo
By
टिम इ सकाळ

साक्री (धुळे) : लष्करात अधिकारी व्हायचे या ध्येयाने झपाटलेला..अखेर जम्मू- काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या तेराव्या पलटणीत दाखलही झाला.. अंगी असलेल्या शौर्य गुणांचा अविष्कार घडविला आणि आज सैन्यदलात "ब्रिगेडियर" म्हणून मान मिळविला. केवळ कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याला त्याचा अभिमान वाटला.

ही गोष्ट आहे साक्री तालुक्यातील छडवेल (प.) येथील मराठे परिवाराच्या ब्रिगेडियर हितेंद्र मराठे या सुपुत्राची. इंडियन मिलिटरी अकँडमीमधून जून १९९५ मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘सेकंड लेफ्टनंट’ पदावर हितेंद्र मराठे हे सैन्यदलात दाखल झाले. जम्मू- काश्मीर लाईट इन्फन्टरीच्या १३ व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. दोन वर्षानंतर कँप्टन म्हणून त्‍यांना बढती मिळाली. सद्या ते कर्नल म्हणून आफ्रिकेतील कॉंगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती दलात सेवेसाठी तैनात आहेत. हा त्यांचा कारकिर्दीतील संयुक्त राष्ट्रांच्या शांती दलाचे सदस्य म्हणून द्वितीय कार्यकाळ आहे. या स्तरावर लष्कराचे निवडक अधिकारी पोहोचतात. अविरतपणे ते भारतीय सेनेची सेवा करत होते. परिणामी आज श्री. मराठे यांना ब्रिगेडियर म्हणून सैन्यदलात बढती मिळाली. जिल्ह्यातील पहिले ब्रिगेडियर होण्याचा मान मराठेंना मिळाल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात.

परिवाराची साथ मोलाची

पाच भावंडे असलेल्या ब्रिगेडियर मराठे यांचे कुटुंबीय उच्चशिक्षित वडील उत्तमराव मराठे तालुक्यातील नामांकित वकील आहेत. तर मोठे बंधू माध्यमिक मुख्याध्यापक, एक बंधू शिक्षक, दुसरे बहूराष्ट्रीय कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी, तर एकजण व्यवसायाने वकील तर सध्या साक्री पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विराजमान आहे. लहानपणापासून सैन्यदलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जितेंद्र यांना कुटुंबीयांसह पत्नी ज्वाला, मुलगा सौरभ आणि मुलगी वैष्णवी यांची मोलाची साथ लाभत आहे. ब्रिगेडियर मराठे यांना मिळालेल्या बढती बद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून त्यांना मिळालेला हा बहुमान तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाराच म्हणावा लागेल.

दोन वेळा सेना पदकाने सन्मान

ब्रिगेडियर मराठे यांना यापूर्वी आसाम मध्ये उल्फा अतिरेक्यांचा खात्मा केल्याबद्दल तसेच कारगील मधील द्रास क्षेत्रातील अतिरेक्यांचा खात्मा, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करणे आणि हस्तगत करणे. या धाडसाबद्दल त्यांना दोन वेळा सेना पदकांनी गौरविण्यात आले आहे.

बंधू हितेंद्र यांना ब्रिगेडियर म्हणून बढती मिळाली ही बाब कुटूंबियांना नक्कीच अभिमानास्पद असून यापुढे देखील त्यांच्या हातून भारतमातेची सेवा घडत रहावो. देशसेवेच्या कार्यात त्यांना अधिकाधिक यश मिळावे ही आमची इच्छा आहे.

- जितेंद्र मराठे, ब्रिगेडियर हितेंद्र यांचे मोठे बंधू.

संपादन- राजेश सोनवणे