esakal | गावठाणावर दावा..दावेदारांची व्‍हावी चौकशी

बोलून बातमी शोधा

land scam
गावठाणावर दावा..दावेदारांची व्‍हावी चौकशी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

सोनगीर (धुळे) : येथील ३४ प्रमुख गावठाण गट गिळंकृत करण्यासाठी नंदुरबार येथील भूमाफिया व येथील एक माजी ग्रामपंचायत सदस्य पुढे सरसावले असून, दोघांत वाद सुरू झाला आहे. दरम्यान, नंदुरबारच्या भूमाफियांनी बनावट कागदपत्रे तयार करून ही जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अहमदशाह फकीर यांचे म्हणणे आहे. हेच म्हणणे त्यांच्या विरोधकांचे असावे, हे स्पष्ट आहे. यावरून कोणा एकाकडे गावठाण जागेचे बनावट दस्तावेज आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. तो बनावटी दावेदार कोण आणि त्याला बनावट कागदपत्रे कोणी तयार करून दिली? ही एक फार मोठी खेळी असून, ग्रामस्थांच्या मते दोन्ही दावेदार नकली आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नंदुरबारच्या काही भूमाफियांनी वडिलोपार्जित जागा असल्याचे सांगत काही गटांवर दावा केला होता. गावात संतापाची लाट उसळली. त्यामुळे घाबरून दहा महिने भूमाफिया शांत राहिले. आता त्याच जागा येथील अहमदशाह फकीर यांनी त्यांच्या वडिलोपार्जित गट असल्याचा दावा केला. चक्क ३४ गटांचा दावा असल्याचे ग्रामस्थांना माहिती झाल्यावर धक्काच बसला. नंदुरबारचे दावा करणारे मूळ सोनगीरचेच रहिवासी असून, ते शाह आहेत. दोन्ही दावेदार शाह असल्याने ते विरोधक आहेत की एकत्र येऊन काही खेळी करीत आहेत, याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

काय असावी खेळी?

गावाच्या विकासासाठी हे गट राखून ठेवले आहेत. हे गट गिळंकृत करण्यासाठी सुरू असलेल्या दोघांच्या वादात गावातील कोणी भाग घेत नाही व मागील अनुभवावरून ग्रामपंचायतही भाग घेणार नाही, असा वाद असणाऱ्यांचा समज आहे. म्हणून नंदुरबारच्या भूमाफियांनी खेळी केली आहे. बाहेरगावाचे असल्याने त्यांना विरोध होईल, म्हणून सोनगीरच्याच एकाने या गटांवर दावा करायचा. दोन्ही दावेदारांनी न्यायालयात जायचे. एकाकडून निकाल लावून घेऊन जागामालकीबाबत न्यायालयाकडूनच शिक्कामोर्तब करून घ्यायचा, असा सध्या बहुतेक गावी सुरू झालेला फंडा वापरायचा ही शक्कल त्यामागे आहे. त्यामुळे जनतेने जागरूक राहून दावेदारांची खेळी हाणून पाडावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.