esakal | रेमडेसिव्हिर संजीवनी नव्हे, ऑक्‍सिजन लागत नसल्‍यास इंजेक्‍शनची गरज नाहीः डॉ. वानखेडकर

बोलून बातमी शोधा

Dr ravi wankhedkar
रेमडेसिव्हिर संजीवनी नव्हे, ऑक्‍सिजन लागत नसल्‍यास इंजेक्‍शनची गरज नाहीः डॉ. वानखेडकर
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : कोरोनाशी लढाईत रेमडेसिव्हिर इंजेक्शनची होणारी मागणी चुकीची आहे. साईड इफेक्ट असलेल्या या इंजेक्शनचा नाद करू नये. रेमडेसिव्हिर इंजेक्शन अमृत किंवा संजीवनी नाही. त्यामुळे जीव वाचेल, असेही नाही. अत्यावश्‍यक वेळी, विशिष्ट प्रकारच्या टप्प्यावरील आजारात उपयोगात आणणे, रूग्णालयातील राहण्याचा कालावधी कमी करण्यासाठी रेमडेसिव्हिर उपयोगात आणण्याची शक्यता आहे, तसे सप्रमाण सिद्ध झाल्याची, ऑक्सिजन नसेल तर रेमडेसिव्हिरची गरज नसल्याची माहिती जागतिक वैद्यकीय संघटनेचे कोशाध्यक्ष तथा आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले.

रेमडेसिव्हिरमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. तसे जागतिक आरोग्य संघटना, युरोपियन सेंट्रल डिसीज सेंटरने अधोरेखीत केले आहे. तसेच क्लिनिकल ट्रायलमधून सिध्द झाले आहे की रेमडेसिव्हिरचा मर्यादीत केसेसमध्ये वापर होण्याची शक्यता आहे. परंतु, भारतात दुसरे कुठलेही ॲन्टी व्हायरल नसल्याने इमरजन्सी युज म्हणून रेमडेसिव्हिरला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या औषधाशिवाय जीव वाचणारच नाही, असे मानून मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. यात ज्यांना गरज त्यांना इंजेक्शन मिळत नाही, गरज नाही त्याला उपलब्ध होत आहे.

रेमडेसिव्हिर १२ वा खेळाडू

कोरोनासंबंधी उपचारात ऑक्सिजन आणि स्टुरॉईडचा रूग्ण बरा होण्यास, जीव वाचविण्यात उपयोग होतो. रेमडेसिव्हिर, टॉसीलीझुमॅब इंजेक्शन यांचा मर्यादीत स्वरूपात उपयोग होण्याची शक्यता आहे. त्यांचा उपयोग होतो, असेही नाही. मर्यादीत केसेसमध्ये दाखल रूग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होते, त्यावेळी रेमडेसिव्हिर, टॉसीलीझुमॅब इंजेक्शनचा उपयोग होण्याची शक्यता आहे. दुसरे कुठलेही औषध नसल्याने सर्व जगात अत्यावश्‍यकतेसाठी या इंजेक्शनच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्रिकेटप्रमाणे रेमडेसिव्हिर, टॉसीलीझुमॅब १२ वा खेळाडू आहे. कोरोनासंबंधी उपचारात ऑक्सिजन, स्टुरॉईडचा शंभर टक्के फायदा होत असल्याने इतर पर्याय शोधण्याची गरज वाटू नये.

ही गल्लत तर करूच नये

अनेक रूग्णांचा सिटी स्कॅनद्वारे एचआरसीटी- सीआरपी रिपोर्टव्दारे उपचारावर भर आहे. त्यात केवळ कोरोनाच नाही, तर पायासह पोटात पू होणे, छातीत पाणी होणे आदी इन्फेक्शनमुळे सीआरपी वाढतो. ही जनरल टेस्ट आहे. रेमडेसिव्हिर व एचआरसीटीच्या स्कोरमध्ये गल्लत करू नये. एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन रिपोर्ट देतो. मात्र, प्रत्यक्षात उपचार कोरोनाबाबत करायचा आहे. यात ज्या रूग्णाला ऑक्सिजन लागत नाही, त्याला रेमडेसिव्हिरची गरज नाही. तपासण्या रूग्णाला काय त्रास होतोय यासाठी आहेत. कोरोनाचा त्रास नाही, तरी मृत्यू झाला, रूग्ण आता चांगला होता, चोवीस तासांत गंभीर झाला, असे काही प्रकार समोर येतात. यात रूग्णावर देखरेख महत्वाची ठरते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यास ताप, दम लागणे, खोकला आहे का या स्थितीवर नजर ठेवली पाहिजे. रूग्णाचा ऑक्सिजन कमी झाला तर रेमडेसिव्हिर उपयोगात आणण्याची शक्यता असते.

नाद केल्याने रूग्णाचा तोटा

रेमडेसिव्हिर खात्रीशीर उपयोगात येईल, असा अभ्यास दिसलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) ट्रायल रिपोर्ट जाहीर केले आहेत. त्यामुळे रेमडेसिव्हिर संजीवनी नाही, तर फक्त हवा झाली आहे. यात मानसिकतेचा गैरफायदा घेऊन काळाबाजार सुरू आहे. शिवाय बनावट इंजेक्शन मिळाल्यास ते तपासणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. रेमडेसिव्हिरचा नाद करून रूग्णांचा तोटा केला जात आहे. जगातील ५५ देशांत ऑक्सिजन, स्टुरॉईड, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या कोरोनावरील उपचारात प्रमाणित झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊ नये. रेमडेसिव्हिरचा अतिवापर आणि नको तिथे वापर धोकेदायक ठरू शकेल. खेडोपाडी डॉक्टर रेमडेसिव्हिर देतात हे पाहून मन खिन्न होते, असे डॉ. वानखेडकर यांनी नमूद केले.

९० टक्के असेच बरे होणारे

कोरोनाची लागण झाल्यावर ९० टक्के रूग्ण असेच बरे होणारे असतात. पाच टक्के बाधितांना रूग्णालयात दाखल करावे लागते. त्यातील अडीच टक्के रूग्णांना आयसीयूची गरज असते, तर एक टक्का बाधितांना व्हेंटीलेटर लागते, असे डॉ. वानखेडकर यांनी सांगितले.

संपादन- राजेश सोनवणे