esakal | कोरोनाचा फास हिरावतोय कुटुंबाची आस..परिवारातील तिघांचा कोरोनाने मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona death
कोरोनाचा फास हिरावतोय कुटुंबाची आस..परिवारातील तिघांचा कोरोनाने मृत्यू
sakal_logo
By
जगदीश शिंदे

साक्री (धुळे) : कोरोनाचा घट्ट झालेला फास कुटुंबातील सदस्यांची आस हिरावणारा ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. साक्री नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. शरद निंबाजी भामरे यांच्यासह पत्नी आणि लहान स्नुषा यांचा कोरोनाने मृत्‍यू झाल्याची घटना एकापाठोपाठ एक घडत गेली. यामुळेच ‘नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे’ असे म्हणण्याची वेळ कुटुंबातील सदस्यांवर आली आहे.

मालपुर (ता. साक्री) येथील मूळचे राहणारे भामरे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून साक्री शहरात वास्तव्यास आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतंत्र प्रतिमा असणारे ॲड. भामरे हे सर्व परिचित व्यक्तिमत्व. सुरुवातीच्या काळात भाडणे येथील साखर कारखान्यात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे भामरे हे नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर शहराचे काही काळ उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान होते.

पती- पत्‍नीचा मृत्‍यू

मागील महिन्याभरापासून कोरोनाने ग्रस्त असलेल्या भामरे दाम्पत्यावर सुरुवातीस धुळे शहरातील खासगी रूग्‍णालयात औषधोपचार सुरू झाले. अशातच एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या दांपत्यातील एक दुवा अर्थात पत्नी निर्मलाबाई यांचे २६ मार्चला उपचार सुरू असताना निधन झाले. तर दुसरीकडे तब्येतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून ॲड. भामरे यांना नाशिक येथील खासगी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. मुले ॲड. राहुल भामरे, प्रा. अभिजीत भामरे, इंजि.सचिन भामरे यांची वडिलांना कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याची धडपड सुरू होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असल्यामुळे ॲड. भामरे यांचा सुमारे चाळीस दिवसांपासून सुरू असलेला लढा मंगळवारी (ता.२७) संपुष्टात आला. आणि अखेर रात्री सुमारे साडेदहा वाजता ॲड. भामरे यांचीही प्राणज्योत मालवली.

लहान सुन गेली अन्‌ अश्रू कोणी पुसावे

नियतीला हे कमी की काय या दोन्ही पती- पत्नींच्या जीविताची काळजी करणाऱ्या कुटुंबावर दरम्यानच्या काळात मोठा आघात झाला तो लहान सून प्राजक्ताच्या रूपाने. ॲड. भामरे यांचे व्यवसायाने अभियंता असलेले सुपुत्र 'सचिन' आणि स्नुषा 'प्राजक्ता' यांनाही या काळात कोरोनाने जाळ्यात ओढले. या संघर्षात सचिन सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले; मात्र पत्नी प्राजक्तास ते यातून बाहेर काढू शकले नाही. प्राजक्ताचाही नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २ एप्रिलला मृत्‍यू झाला. या घटनाक्रमात कोणाचे अश्रू कोणी पुसावे हा निशब्द करणारा प्रसंग कुटुंबातील सदस्यांसमोर क्रूरपणाने उभा ठाकला आहे.

संपादन- राजेश सोनवणे