शहादा पालिकेने घेतला असा निर्णय की संपुर्ण आवार दिवसभर मोकळे

लोटन धोबी
Friday, 18 December 2020

पर्यावरण संरक्षणासह इंधन बचत व्हावी. धावपळीच्या युगात शरीराला किमान एक दिवस व्यायाम व्हावा, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला.

शहादा (नंदुरबार) : येथील पालिकेत ‘नो व्हेइकल डे’ पाळण्यात आला. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या आवाहनाला पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. 
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, पर्यावरण संरक्षणासह इंधन बचत व्हावी. धावपळीच्या युगात शरीराला किमान एक दिवस व्यायाम व्हावा, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्त्वावर ‘नो व्हेइकल डे’ साजरा केला. या पुढे प्रत्येक मंगळवारी पालिकेचे कर्मचारी यात सहभागी होतील. 
आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकाजवळ वेळ नाही, असे सांगतो. परिणामी, विविध व्याधी जडतात. नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे असतानाही ते शक्य नसल्याने व्यायामाकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय वाहनांच्या धुरामुळे वातावरण प्रदूषित होते. त्याला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कुठलेही वाहन न वापरण्याचा संकल्प पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला. सर्व कर्मचाऱ्यांनी घरून कार्यालयात चालत येऊन दैनंदिन काम केले. 

सर्व कर्मचारी येणार पायी
राज्य शासनातर्फे माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. यात आठवड्यातून एक दिवस नो व्हेइकल डे अर्थात या दिवशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी कुठलेही वाहन न वापरतात पायी अथवा सायकलीवर दैनंदिन कामकाज करावे. या अभियानांतर्गत पालिका सहभागी झाली आहे. 
 
दर मंगळवारी ‘नो व्हेइकल डे’ 
आठवड्यातील प्रत्येक मंगळवार आठवडेबाजाराचा दिवस  असल्याने या दिवशी शक्य आहे, त्या सर्वांनी आपली सगळी कामे पायी अथवा सायकल वापरूनच करायची. दुचाकी किंवा चारचाकी वाहन वापरू नये. आठवड्यातून फक्त एक मंगळवार नो व्हेइकल डे साजरा करायचा आहे. या अभिनव उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहान मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shahada palika decide no vehicles day