esakal | अचानक एवढी जागा आली कुठून?

बोलून बातमी शोधा

land

अचानक एवढी जागा आली कुठून?

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : सोनगीरच्या जवळपास ३४ गावठाण व खासगी जागांसह सबरगड डोंगराजवळील जागा पूर्वजांची असल्याचा बहाणा करीत नंदुरबारच्या रहिवाशांनी कोट्यवधींची गावठाण जागा लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र जागरूक ग्रामस्थांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तहसील कार्यालयात धाव घेतली. त्यामुळे तस्कर भांबावले व त्यांच्या हालचाली थंडावल्या. गावात हे प्रकरण प्रचंड गाजत असताना या जागा आमच्या वडिलोपार्जित असल्याचा दावा त्या वेळी अहमदशाह फकीर यांनी का केला नाही? एवढेच नव्हे तर ते व त्यांचे पूर्वज येथे राहत असताना कधीच जागेबाबत त्यांनी दावाच काय कोणाशी चर्चाही केली नाही. एकाही ग्रामस्थाला त्यांच्याकडे एवढी जमीन असल्याची पुसटशी कल्पना नाही. मग अचानक त्यांच्याकडे एवढी जागा आली कुठून, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी मिळविलेल्या कागदपत्रांवरून २०१३ पर्यंत सबरगड व त्याभोवतालची जमीन गावठाण म्हणून नोंद आहे. २०१३ नंतर असे काय झाले की अचानक नंदुरबारच्या रहिवाशांच्या नावे ही जागा झाली. आता त्याच जागेवर सोनगीरच्या एकाने नोटिशीद्वारे दावा केला. या संदर्भात त्यांनी कोणती कागदपत्रे तहसीलदार व अन्य महसूल विभागाला पुरविली याबाबत माहिती मिळत नाही. ते कागद दडपण्याचाच प्रयत्न होताना दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. येथील केवळ थोडीथोडकी जागा नव्हे तर अर्ध्या गावाची जागा बळकावण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी काही गट बळकावला गेला आहे.

जुनी कागदपत्रे मिळविली

एका धार्मिक स्थळाची जागा बळकावून नंदुरबारच्या जमीन तस्करांनी चौपदरीकरणात जागा गेल्याचे दाखवून लाखो रुपये लाटले आहेत. या धार्मिक जागेबाबतही त्यांचे यापूर्वीच झालेले वाद तडजोडीअंती मिटले आहेत. येथील काहींनी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालयातून जुनी कागदपत्रे मिळविली आहेत. १९५२ पासून ते थेट २०१३ पर्यंत कागदपत्रांवर कुठेही जागा बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे नाव नाही. १९५२ मध्ये या जागांना सर्व्हे क्रमांक होते. १९६५ नंतर सर्व्हे क्रमांकाऐवजी गट क्रमांक लागले. बहुतांश रिकाम्या जागा गावठाण जागा झाल्या. ६५, ६६ व ६७ गटात सबरगड डोंगर येतो, असे सांगितले. मात्र तलाठी कार्यालयात याबाबत कोणतीही नोंद आढळत नाही. याचाच गैरफायदा घेऊन तीन गटांतील गावठाण जागेसह सबरगड डोंगर आमच्याच मालकीचा असून, तो विकण्याचा प्रयत्न नंदुरबारच्या तस्करांनी केला. सौदा झालेला असतानाच ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केल्याने पुढील प्रक्रिया थांबली असून, खरेदी व विक्री करणारे दोन्ही गट वेट ॲ‍न्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. ग्रामस्थ किती दिवस लढतात त्यानंतर शांतता झाली की पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा डाव असल्याचे ग्रामस्थांनी ओळखले होते.

दोषींवर कारवाईची ग्रामस्थांकडून मागणी

येथील अहमदशाह फकीर यांनी दावा करून खळबळ उडवून दिली आहे. पूर्वी फक्त तीन गटांचा वाद असावा असे वाटत होते. मात्र तब्बल ३४ गटांबाबत वाद असल्याचे नोटिशीवरून समजून आल्याने ग्रामस्थांना धक्का बसला आहे. त्यापैकी काही गट चक्क काही ग्रामस्थांच्या नावावर असून, विविध कामांसाठी अनेक वर्षांपासून वापरात आहेत. या पार्श्‍वभूमीवर बनावट कागदपत्रे तयार करणारे व करून देणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

(क्रमशः)