esakal | सोनगीर गावठाण प्रकरण; अधिकाऱ्यांकडून दाव्यांबाबत टोलवाटोलवी

बोलून बातमी शोधा

songir land

सोनगीर गावठाण प्रकरण; अधिकाऱ्यांकडून दाव्यांबाबत टोलवाटोलवी

sakal_logo
By
टिम इ सकाळ

सोनगीर (धुळे) : येथील ३४ गटांवरील दाव्यांबाबत गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरू असताना तहसील कार्यालय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी साधी चौकशी तर सोडाच पण ग्रामस्थांना विचारपूसही केली नाही. विशेष म्हणजे ज्या तलाठ्यांनी एवढ्या जागा चिरीमिरी देऊन नावे करून दिल्या त्यांच्याबाबत चौकशीसह कारवाई केली जात नसून संबंधित तलाठ्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे.

सोनगीर गावठाण जागेबाबत गोंधळाची स्थिती असून, अनेक गट व गावठाण यांचा थांगपत्ता लागत नाही. आठ महिन्यांपासून वाद सुरू असताना तहसीलदार गायत्री सैंदाणे येथे चौकशीला आल्या नाहीत. अर्धे गाव गिळंकृत करण्याचा डाव असताना तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासक कपिल वाघ व ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी या प्रकरणी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते. आतातरी ग्रामपंचायतीने जागे व्हावे व आपल्या गावातील जागा लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव हाणून पाडावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गावठाण गिळंकृत करण्याचा डाव

सबरगडालगतची जागा नंदुरबार येथील काहींनी आमच्या पूर्वजांची असल्याचे सांगत आम्ही तिथे शेती करतो, असे दाखविले. मात्र त्या जागी वस्ती असून, शेतीबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. विभागीय आयुक्त नाशिक व तहसीलदार धुळे यांच्याकडे जागेसंदर्भात सुनावणीकडे तत्कालीन तलाठी व अन्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावठाण जागा गिळंकृत करण्याचा डाव आहे. गावातील अशा अनेक भूखंडांबाबत तत्कालीन तलाठ्यांनी उलटसुलट नोंदी केल्याचा आरोप करत त्या सर्वांच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संगणकीकृत करताना गोंधळ

गावालगतची बहुतांश जागा १९७० मध्ये बिनशेती गावठाण म्हणून घोषित झाली आहे. जुन्या कागदपत्रांत फेरफार करून जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे असे उद्योग येथे सुरू आहेत. दरम्यान, गावठाण जागेचा नकाशा व प्रत्यक्ष बऱ्याच जागांचा ताळमेळ बसत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. त्याबाबत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी रजिस्टरवरील गावठाण व अन्य जागांच्या नोंदी संगणकीकृत करताना तत्कालीन तलाठ्यांनी प्रचंड गोंधळ केला. एकाची जागा दुसऱ्याच्या नावावर असेही प्रकार घडले आहेत. संगणकात गावाची शेती, गावठाण तसेच रहिवासी क्षेत्राची माहिती फीड करताना पैसे देऊन बहुतांश जागा आपल्या नावावर भूखंडमाफियांनी करून घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे.

जागा गावाच्या, वाद दुसऱ्यांमध्ये

आता त्याच ३४ गावठाण जागा अहमदशाह फकीर यांनी त्यांच्या वडिलोपार्जित असल्याचा दावा केला. वाद असलेल्या ३४ गटांवर शेकडो वर्षांपासून कोणीही दावा केला नाही. अचानक गेल्या वर्षी नंदुरबारच्या तस्करांनी व आता गावातील एकाने जागेबाबत दावा केला आहे. विशेष म्हणजे जागा गावाच्या आणि वाद दुसऱ्याच दोघांमध्ये सुरू असल्याने चर्चेचा व संतापाचा विषय ठरला आहे.

(क्रमशः)