esakal | गावच्या अर्ध्या जमिनींवर एकाच व्यक्तीचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

songir gram panchayat

गावच्या अर्ध्या जमिनींवर एकाच व्यक्तीचा दावा

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : येथील सबरगड व गावठाण जागा गिळंकृत करण्याच्या प्रकारावरील चौकशी व निकाल प्रांताधिकारी भीमराव दराडे यांच्याकडे पेंडिंग असताना येथील एकाने जवळपास अर्ध्या गावातील जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा करत या जागेची खरेदी- विक्री करू नये, अशी नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पूर्वी राजेलोकांकडे एवढी इस्टेट नसेल त्यापेक्षा जास्त जमीनीच्या क्षेत्रावर दावा सांगणारी ही व्यक्ती साध्या घरात राहते. त्यामुळे अचानक एवढी जमीन त्यांच्या पूर्वजांकडे आली कुठून याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. दावा केलेली जमीनीचे आजचे भाव लक्षात घेता ती कोट्यवधी रुपये किमतीची असून, डोळे विस्फारतील अशी स्थिती आहे.

३४ मिळकतींवर दाखविला हक्‍क

येथील अहमदशाह बुरानशाह फकीर यांनी दावा केला आहे की सोनगीर येथील गट क्रमांक ४, ५, ६, १५, २०, २१, ३७, ३८/१, ३८/२, ४२, ४७, ५९, ६१, ६५, ७६, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६, ८७, ८९, ९१, ९८, १०७, २१७, २४२, २५०, २५३, २५४, २६१ आणि ३३८ अशा ३४ मिळकती आमच्या वडिलोपार्जित मालकीच्या असून, त्यावर माझा कायदेशीर हक्क व अधिकार आहे. मात्र युसूफ शाह निमडू शाह फकीर, सुलतान शाह बाबूशाह आदींनी बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नावे करून घेतली आहे. त्या आधारे ते विक्री करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच अहमदशाह फकीर न्यायालयात जाणार असल्याने ही जागा कोणीही सौदा, करार, भाडेपट्टी, अदलाबदल, खरेदी, बक्षीस, लीज आदी व्यवहार करू नये. असे त्यांचे म्हणणे आहे.

त्‍या जागेचे नेमके रहस्‍य काय?

दरम्यान ही जागा ग्रामपंचायतीची असून, पूर्वीच्या नोंदीवर केवळ गावठाण म्हणून नोंद आहे. पाच महिन्यांपूर्वी हीच जागा नंदूरबारच्या जमीन तस्करांनी हडपण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे, तर येथील प्राचीन सबरगड नावाची टेकडीदेखील तीन कोटी रुपयाला विक्रीचा घाट घातला. पण ‘सकाळ’ने मालिका लावत त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. मात्र महसूल खात्याने हे प्रकरण भिजतं घोंगडे ठेवले आहे. आता अचानक येथील अहमदशाह फकीर त्याच जागेवर दावा करीत आहे. त्यामुळे यात काहीतरी गौडबंगाल असून मोठी खेळी केली जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी ग्रामस्थ संतप्त झाले असून गावात वादविवाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन ताबडतोब कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. (क्रमशः)

संपादन- राजेश सोनवणे

loading image