
हिरवा वेश परिधान करून दोन महिलांनी रविवारी (ता. २८) गावात प्रवेश केला. आम्ही देवीचे भक्त देवीच्या जोगवा मागत आहोत, असे सांगत होते. पुरुष कामानिमित्त बाहेर असल्याने या महिलांनी संधी साधली
वडाळी (नंदुरबार) : महिलांना संमोहित करून त्यांना देवी-देवतांची वक्रदृष्टी झाल्याचे बतावणी करत त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याचा प्रकार वडाळी (ता. शहादा) येथे घडला. मात्र, त्यांची विचारपूस केल्यावर त्यांचे बिंग फुटले.
याबाबत पोलिसपाटलांनी पुढाकार घेऊन घेतलेले पैसे परत करण्याचे खडसावल्याने या महिलांनी अनेक ठिकाणाहून घेतलेले पैसे परत केले. अशा प्रकारचे कृत्य करण्याबाबत तंबी देऊन या महिलांना त्यांच्या गावी मार्गस्थ केले.
हिरवा वेश परिधान करून दोन महिलांनी रविवारी (ता. २८) गावात प्रवेश केला. आम्ही देवीचे भक्त देवीच्या जोगवा मागत आहोत, असे सांगत होते. पुरुष कामानिमित्त बाहेर असल्याने या महिलांनी संधी साधली व बोळवट दिसणाऱ्या महिलांना संमोहित करून त्यांना हातचलाखीचे प्रयोग करत कापूर, गुलाल खडीसाखर अशा वस्तू चमत्कार करून दाखविण्यास सुरवात केली. तुमच्या घरात अशांती राहते. तुमच्यावर अनेक संकटे येतात. तुमच्यावर देवदेवतांची वक्रदृष्टी आहे. यावर उपाययोजनेसाठी देवीचा अभिषेकासाठी गुप्तदानाचे मागणी करू लागले.
मग करू लागले गयावया
चमत्कारावर विश्वास ठेवत महिलांनी आपल्याजवळ असलेली पुंजी त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्याच वेळी पोलिसपाटील गजेंद्रगिरी गोसावी यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या महिलांना खडसावल्याने चोरी उघड झाली. महिलांनी पोलिसपाटलांसमोर गयावया करून पोटासाठी करीत आहोत. क्षमा करा, अशी विनवणी करू लागल्या. त्यांच्या आधारकार्डवरून त्या जळगाव जिल्ह्याच्या असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, अशा चमत्कारिक गोष्टीमुळे अनेक महिला लुबाडल्या जात असल्याने श्री. पाटील यांनी त्यांना तंबी देऊन पुन्हा असा प्रकार होणार नाही, याबाबत खडसावून सांगून त्यांना त्यांच्या गावी मार्गस्थ केले.
अचानक लक्ष गेले तोपर्यंत दहा ते १५ महिलांना त्यांनी गंडवल्याचे लक्षात आले. आपण गुप्तदान दिल्याची चर्चा सुरू होती. त्या वेळेस या महिलांकडून दिलेल्या पैशांबाबत खातरजमा करून त्या महिलांना पैसे परत करून देण्यात आले. त्यांना तंबी देऊन गावी पाठविण्यात आले.
-गजेंद्र गोसावी, पोलिसपाटील, वडाळी
संपादन ः राजेश सोनवणे