
कमीत कमी २०- ३० उच्च धोका संपर्कातील व कमी धोका संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गृहविलगीकरण किंवा अलगीकरण करावे. बाधित रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला, ते ठिकाण, कार्यक्रमाचा शोध घेऊन त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करावी.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले.
प्रांताधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्याधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करून त्यात रुग्णांसाठी आवश्यक साहित्य कुठल्याही क्षणी वापरता येतील, अशा स्थितीत आणून ठेवण्याच्या सूचना श्री. भारूड यांनी दिल्या. कमीत कमी २०- ३० उच्च धोका संपर्कातील व कमी धोका संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गृहविलगीकरण किंवा अलगीकरण करावे. बाधित रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला, ते ठिकाण, कार्यक्रमाचा शोध घेऊन त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करावी. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यास तो परिसर प्रतिबंधित करावा. मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
विवाह सोहळ्यांना परवानगी आवश्यक
पोलिस, घटना व्यवस्थापक, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी विवाह सोहळा, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना नियंत्रित करावे. विवाहात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळ्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती व ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करावी.
सर्वांना मास्क बंधनकारक
कुलसचिव, प्राचार्य, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात का, हे तपासावे. प्रत्येक वर्गात सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबण ठेवावा. प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी खासगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रे आदी ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर होत आहे की नाही, याची तपासणी करावी. बाजार समिती भाजीपाला मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल याठिकाणी दुकानदार, कर्मचारी, विक्रेत्यांना मास्क लावणे बंधनकारक करावे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक करावे. रेल्वे, एसटी, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, काळी-पिवळीचालकांना जादा प्रवासी बसविण्याबाबत बंदी करावी. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे