esakal | शासनाची ‘ई-संजीवनी ओपीडी’ सेवा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

e-sanjivani opd

शासनाची ‘ई-संजीवनी ओपीडी’ सेवा सुरू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोठ्या गावात एकही कोरोनाबाधित (nandurbar corona update) आढळल्यास त्या संपूर्ण परिसरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी आणि त्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (nandurbar collector rajendra bharud) यांनी दिले. तर कोरोनाकाळात डॉक्टरांकडून घरबसल्या मोफत सल्ला घेण्यासाठी शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओपीडी’ ही ऑनलाइन सेवा सुरू झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. (coronavirus-esanjivani-opd-start-nandurbar-collector-rajendra-bharud)

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ. भारूड म्हणाले, कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्व नागरिकांचे स्वॅब संकलन करावे. प्रत्येक १५ दिवसांनी व्यावसायिक, फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेत्यांची ॲन्टिजेन चाचणीसाठी विशेष मोहीम घ्यावी. संपर्क साखळीतील एकही व्यक्ती चाचणीपासून सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातील तापाच्या रुग्णांचे स्वॅब घ्यावेत.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात केवळ २९ टक्के जलसाठा

विशेष मोहीम राबवावे

जिल्ह्यात लशींचा पुरेसा पुरवठा असल्याने दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या लसीकरणासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिबिर आयोजित करताना लशींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा यंत्रणेसाठी समन्वय ठेवावा आणि दुर्गम भागात अधिक शिबिरांचे आयोजन करावे. वॉर्डनिहाय आणि गावनिहाय याद्या तपासून कमी लसीकरण असलेल्या गावात विशेष मोहीम राबवावी. डीएम फेलोज, बचतगटांचे सदस्य यांचा उपयोग जनजागृतीसाठी करावा. रुग्णवाहिकांचा उपयोग अधिक गरज असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राधान्याने करावा. बाइक ॲम्ब्युलन्ससाठी चालकांना प्रशिक्षण द्यावे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक नियोजन करावे. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे सुरू करावी.

..अशी आहे सेवा

ई-संजीवनी ॲपद्वारे सोमवार ते रविवार सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी १ः४५ ते सायंकाळी पाच, या वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. रविवार आणि सुटीच्या दिवशी ही सेवा सुरू राहणार आहे. सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना एसएमएसद्वारे ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते. ते दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲप्लिकेशनमध्ये केली आहे. राज्यात दररोज ३०० रुग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत. या सुविधेसाठी नागरिकांनी ‘ई-संजीवनी ओपीडी’ ॲप डाउनलोड करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी केले आहे.

loading image