जग लढतेय कोरोनाशी अन्‌ नेत्‍यांचा लढा आम्‍ही श्रेष्‍ठ दाखविण्याचा

कोरोनाने वर्षभरात ३० हजार ५०० रुग्णांना ग्रासले. आठ हजार २०० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर सातशेवर रुग्णांचा बळी गेला आहे.
nandurbar political wor
nandurbar political wornandurbar political wor

नंदुरबार : कोरोनाने वर्षभरात ३० हजार ५०० रुग्णांना ग्रासले. आठ हजार २०० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर सातशेवर रुग्णांचा बळी गेला आहे. अनेक कुटुंबांमधील दगावलेल्या व्यक्तींची दुःखाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांच्या पापण्या वाळत नाहीत, तोच दुसरा दगावत आहे. स्मशानात मृतदेहांच्या रांगा लागत आहेत. कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना गरज आहे, ती मदतीची. मात्र, जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यामुळे सध्या लोकप्रतिनिधींचे पॉलिटिकल वॉर चांगलेच रंगले आहे.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, आमशा पाडवी व खासदार डॉ. हीना गावित यांच्यात सध्या रेमडेसिव्हिर उपलबधता व वाटपावरून आरोप- प्रत्यारोपांचा आखाडा चागलाच रंगला आहे.

श्री. रघुवंशी यांनी रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना अत्यल्प दरात रेमडेसिव्हिर उपलब्ध करून दिले. त्यापाठोपाठ माजी आमदार शिरीष चौधरी व डॉ. रवींद्र चौधरी, त्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी जनतेची सेवा सुरू केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी वेलनेस सेंटरला काही अटी व शर्तींच्या माध्यमातून एक हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध करून दिले. त्यावर पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी व श्री. रघुवंशी यांच्यात सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला. त्यानंतर खासदार डॉ. गावित, आमदार राजेश पाडवी यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे रेमडेसिव्हिरची मागणी केली. ती नाकारल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे जिल्हधिकारी डॉ. भारूड यांना लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

रघुवंशींचा खासदारांवर आरोप

माजी आमदार रघुवंशी यांनी रविवारी (ता. १८) खासदार डॉ. गावित यांच्यामुळेच रोटरी वेलनेस सेंटरमधून रेमडेसिव्हिरवाटप बंद करावे लागल्याचा आरोप केला, तर शिवसेनेचे अक्कलकुवा-नवापूर विभागाचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी पालकमंत्री श्री. पाडवी यांच्यावर ताशेरे अढत आरोप केले, तर सोमवारी (ता. १९) पुन्हा श्री. रघुवंशी यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासठी खासदार डॉ. गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोपांचे खंडन करून रेमडेसिव्हिर वाटपात घोळ केल्याचा व मोफतचे इंजेक्शन विक्री केल्याचा आरोप केला व त्याचा हिशेब सादर करावा, अशी मागणी केली.

श्रेयवादाची लढाई कशासाठी?

एकीकडे कोरोनाचे भयावह संकट असताना, त्यातून जनतेला बाहेर काढून दिलासा देण्याची व मदतीची गरज आहे. कोणाला बेड मिळत नाही, कोणाला रुग्णवाहिका मिळत नाही, कोणाकडे मेडिसिनसाठी पैसे नाहीत, तर पैसे आहेत मात्र रेमडेसिव्हिर मिळत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे आजी-माजी लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, पक्षप्रमुखांनी एकमेकांची उणीदुणी काढून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्याकडून संकटाने पिचलेल्या जनतेला काय मदत करता येऊ शकते, याचा विचार केला, तर खऱ्या अर्थाने कोरोनाला संघटितपणे लढा दिल्यासारखे होईल. रोज अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये वेटिंगवर असलेल्या मृतदेहांची संख्याही कमी होईल यात शंका नाही. त्यामुळे वाद विसरून कोरोनाला हरविण्यासाठी तन, मन, धनाने प्रामाणिकपणे सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com