esakal | शाळा बंद पण मुख्याध्यापकाला चैन पडेना; शिक्षक नाही सोबतीला पण त्‍यांची शाळा सुरू

बोलून बातमी शोधा

school head master

शाळा बंद पण मुख्याध्यापकाला चैन पडेना; शिक्षक नाही सोबतीला पण त्‍यांची शाळा सुरू

sakal_logo
By
टिम इ सकाळ

नंदुरबार : कोरोना लसीकरणाला ग्रामस्थांचा गैरसमजामुळे विरोध असल्याने नोंदणीला मिळणारा नकार, अशात दुर्गम डोंगराळ भाग, साधनांच्या मर्यादा, यापूर्वीच्या प्रयत्नात आलेले अपयश, अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही अक्कलकुवा तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळा पाटीलपाडाचे मुख्याध्यापक दिपक वसावे यांनी अभिनव कल्पना लढवत गावात ४ ग्रामस्थांची लसीकरणासाठी नोंदणी केली.

चार ही संख्या मोठी नसली तरी प्रयत्नपूर्वक केलेल्या कामामुळे आणि त्यामुळे झालेल्या बदलाची निदर्शक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी नोंदणीचे काम शिक्षकांमार्फत होत आहे. मुख्याध्यापक वसावे यांनी लसीकरण जनजागृतसाठी मित्राशी चर्चा करून ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे निश्चित केले. आपली दुचाकी काढत दररोज प्रार्थनेसाठी घेतलेला ध्वनीक्षेपक स्वत:च्या दुचाकीवर ठेवत माईक घेऊन गुरुवारी पाटीलपाड्यावर पोहोचले. ग्रामीण भागात अजूनही ध्वनीक्षेपकाचे आकर्षण असल्याने विखुरलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ घरातून बाहेर पडत ऐकू लागले. संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी वसावे यांनी स्थानिक भाषेचा उपयोग केला. त्यामुळे त्यांना प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे.

लसीसाठी कुठे जावे अन्‌ त्‍याचे फायदे

लसीकरणाचे फायदे, लसीकरण कुठे सुरू आहे, लसीकरणासाठी वयाची पात्रता, लस घेऊन आल्यावर घ्यावयाची दक्षता, मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन आदी बाबी दुर्गम भागात पोहोचल्या. शेवटी त्यांनी लसीकरणासाठी आवाहन केले असता ४ ग्रामस्थ तयार झाले. त्यांनी ही संधी न दवडता मोबाईल कव्हरेजसाठी जवळची टेकडी गाठत आधार कार्डच्या सहाय्याने नोंदणी केली. नागरिकांना माहिती दिल्यावर ते प्रतिसाद देतात. काही ठिकाणी दुचाकी ठेऊन पायी जावे लागते. पण नागरिक लसीकरणासाठी तयार झाल्यावर थकवा जाणवत नाही, अशा शब्दांत वसावे यांनी पहिल्या दिवसाचा अनुभव व्यक्त केला. त्यांना गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी आणि मुख्याध्यापक सुनील मावची यांचे सहकार्य लाभले.

अत्यंत संवेदनशील आणि हुशार शिक्षक असे वसावे यांचे वर्णन करता येईल. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्यांचा भर असतो. उपक्रमशील आणि अभ्यासू शिक्षक आहेत. झोकून देऊन काम करण्याची त्यांची पद्धत या उपक्रमातही दिसून येते. जनतेचा प्रतिसाद ते मिळवतील याची खात्री आहे.

- रमेश देसले, गटशिक्षणाधिकारी.