दोन दिवसांत दोनशेवर कोरोनाबाधित बरे 

धनराज माळी
Monday, 28 December 2020

नंदुरबार जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रोज ३० ते ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने चिंता वाढली आहे.

नंदुरबार : दोन दिवसांत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, दोनशेवर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ४४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
नंदुरबार जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रोज ३० ते ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. दोन दिवसांत सुमारे पावणेदोनशे जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील ४०, शहाद्यातील १००, अक्कलकुव्यातील सात, नवापूर येथील १४, तळोद्यातील नऊ, धडगावातील तिघांचा समावेश आहे. असे असले तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. सद्यःस्थितीत जिल्हाभरात ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील १३९, शहाद्यातील २१८, तळोदा २६, नवापूर ३१, अक्कलकुव्यातील ११, तर धडगावातील १७ रुग्णांचा समावेश आहे. 

रेशिओ बरोबरीत
अद्याप जिल्हाभरात सात हजार ३२९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये सर्वाधिक दोन हजार ८५५ रुग्ण शहादा तालुक्यातील होते. त्यापाठोपाठ नंदुरबारला दोन हजार ७५९, नवापूर- ७११, तळोदा- ७०२, अक्कलकुवा- २५०, तर धडगाव येथील ५२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनाने जिल्हाभरात १६५ जणांचा बळी गेला आहे. यात नंदुरबार- ५७, शहादा- ५९, तळोदा- २७, नवापूर- १७, अक्कलकुवा- तीन, तर धडगावातील दोघांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असली, तरी रुग्ण संख्याही तेवढीच वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news coronavirus two hundred patient recover last two days