
आजी- आजोबांना भेटण्यासाठी गावी आला होता. आठ दिवस राहिल्यानंतर आता घरी जातो म्हणून आजी- आजोबांचा निरोप घेत मोटारसायकल घेवून निघाला. परंतु, घरी पोहचलाच नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली. या दरम्यान पहाटेच त्याला पाहून संपुर्ण परिवाराला हादरा बसला.
वडाळी (नंदुरबार) : कोंढावळ (ता. शहादा) येथील चंद्रकांत राजेंद्र माळी (वय 22) या युवकाने दारूच्या नशेत लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
येथील चंद्रकांत राजेंद्र माळी (वय 22) हा गेल्या चार- पाच वर्षापासून रोजगारासाठी सुरत येथे आपल्या आई व भावासोबत राहत होता. अधून- मधून तो गावी आजी- आजोबांना भेटण्यासाठी येत जात होता. गेल्या आठ दिवसापासून तो आजी-आजोबांना भेटण्यासाठी कोंढावळ येथे आला होता.
मोटारसायकलने रात्री निघाला पण
दरम्यान शनिवारी (ता. 26) सकाळी सुरतला परत जात आहे असे सांगून मोटारसायकल घेऊन तो निघाला. रात्री बराच उशीर झाल्याने आजी- आजोबांनी त्याच्या आईकडे चंद्रकांत घरी पोहोचल्याबाबत विचारणा केली. मात्र चंद्रकांत घरी पोहोचला नाही असे त्याच्या आईने सांगितल्यावर नातेवाईकांकडे आई, आजी- आजोबांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री संपर्क न झाल्याने परत त्याच्या संपर्क साधून चंद्रकांतबद्दल माहिती घेतली. मात्र चंद्रकांत घरी आला नसल्याने आजी- आजोबांना व काकांना धास्ती वाटू लागली.
शेतात दिसली मोटारसायकल व हेल्मेट
सकाळी चंद्रकांतची मोटर सायकल व हेल्मेट शेजारच्या राहुल गोसावीच्या शेतात उभी असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याचे काका व गावकरी यांनी शेतात जाऊन मोटरसायकलची पाहणी करून त्याचा तपास करण्यासाठी फिरू लागले. यावेळी चंद्रकांत हा कैलास माळी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याचे काका अंबालाल माळी यांनी सारंगखेडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची खबर दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्याठिकाणी डॉक्टर राजेंद्र दुगड यांनी शवविच्छेदन केले.
संपादन ः राजेश सोनवणे