नातेवाईकाकडे सोडून देण्यासाठी कबूल केले पाचशे रूपये; दिले नाही म्‍हणून डोक्‍यात घातला दगड

धनराज माळी
Sunday, 3 January 2021

स्थानकाबाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांना हात देऊन त्याच्या नातेवाईकाडे सोडुन देण्याची विनंती करीत होता. त्यावेळी योगेश विठ्ठल सुळ तेथून जात असतांना त्या तरूणाने त्यास त्याच्या नातेवाईकांकडे सोडून देण्यास सांगितले व मोबदल्यात त्यास ५०० रुपये देण्याचे मान्य केले;

नंदुरबार : शहरातील जगताप वाडी चौफुलीवरील तुळजा भवानी किराणा दुकानासमोर पाचशे रूपये दिले नाही म्हणून दगडाने ठेचून तरूणाचा खून करणाऱ्यास पोलिसांनी आज गजाआड केले आहे. 

जगतापवाडी चौफुलीजवळ २७ डिसेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अडावद (ता. शहादा) येथील तरूणाचा डोक्यात दगड मारुन गंभीर दुःखापत करुन खून केला होता. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात २८ डिसेंबरला खुनाचा गुन्हा दाखल होता. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थाकिन गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महत्वाचे पुरावे जप्त करुन तपास सुरु केला होता. गुन्हे अन्वेषण शाखेचे ४ स्वतंत्र पथक तयार केले. 

तरूणीच्या आधारकार्डावरून शोध
मृत तरूणाजवळ आंबापुर (ता. शहादा) येथील तरूणीचे आधार कार्ड आढळले. त्याप्रमाणे शोध घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नांव राकेश दिवान खडे (रा.आडगांव, ता.शहादा ) असे असून तो तरूणीचा मेहुणा असल्याचे निष्पन्न झाले. गुप्त माहितीवरून तपासाची चक्रे फिरविले. उपयुक्त माहिती मिळाली, त्यावरून ५ ते ६ जणांचा शोध घेतला. योगेश विठ्ठल सुळ (वय २४ रा. सरस्वतीनगर, नंदुरबार) याचा हालचालीवरून संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन खुनाबाबत विचारले असता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. वारंवार वेगवेगळी माहिती देऊ लागला. त्यास पोलिसी खाक्या दाखविला असता योगेश सुळ याने गुन्ह्याची कबुली दिली. वाहनही त्याचे घरी लावलेले असल्याचे सांगितले. त्याची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे . 

पाचशे रूपयासाठी खून 
मृत खडे हा बस स्थानकाबाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांना हात देऊन त्याच्या नातेवाईकाडे सोडुन देण्याची विनंती करीत होता. त्यावेळी योगेश विठ्ठल सुळ तेथून जात असतांना त्या तरूणाने त्यास त्याच्या नातेवाईकांकडे सोडून देण्यास सांगितले व मोबदल्यात त्यास ५०० रुपये देण्याचे मान्य केले; परंतु तो तरूण दारु पिलेला असल्याने त्यास त्याच्या नातेवाईकाचा पत्ता व्यवस्थितपणे सांगता येत नव्हता, त्यामुळे बराच वेळ होऊन देखील मयतास त्याचे नातेवाईकाचे घर सापडत नसल्याने मयत व योगेश विठ्ठल सुळ हे दोन्ही जगतापवाडी येथे परत आले. योगेश सुळ याने मयताकडे ५०० रुपये मागितले असता ते देण्यास नकार दिला व दोघांमध्ये भांडण झाले. त्यात योगेश याने दगड डोक्यात मारुन जिवेठार मारले असल्याचे सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news crime news five hundred rupees and murder case