हळद रूसली नाही..उलट हसविले अन्‌ केली आर्थिक स्‍थिती मजबूत

संजय मिस्‍त्री
Wednesday, 7 April 2021

हळदीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापासून अनेक औषधींसह स्वयंपाकातही मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या कोरोना काळात हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र हे पीक खानदेशात कमी प्रमाणात घेतले

वडाळी (नंदुरबार) : निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, खते बी-बियाणे यांच्या वाढलेल्या किमती यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले असतानाच जयनगर (ता. शहादा) येथील विठोबा रामदास माळी या प्रयोगशील शेतकऱ्याने दहा वर्षांपासून हळद पिकाची लागवड करून एकरी भरघोस उत्पन्न काढत आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. यामुळे मजुरांनाही बारमाही रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. 
हळदीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापासून अनेक औषधींसह स्वयंपाकातही मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या कोरोना काळात हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र हे पीक खानदेशात कमी प्रमाणात घेतले जाते. त्यातच नंदुरबार जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी या पिकाची लागवड करतात. हे पीक नऊ महिने कालावधीचे असल्याने त्यातच आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात असल्याने इतर शेतकरी जोखीम स्वीकारत नाहीत. मात्र येथील विठोबा माळी या प्रयोगशील शेतकऱ्याने सलग दहा वर्षांपासून हळद पिकाची लागवड केली. 

सुरवातीला अडचणीचे पण
लागवड, बाजारपेठ व त्यावरील प्रक्रिया या बाबींसाठी सुरवातीला अडचणीचे ठरले. त्यातून कृषी विभाग व अन्य ठिकाणाहून मार्गदर्शन घेऊन दहा वर्षांपासून दहा एकरमध्ये पिकाची लागवड करीत आहेत. एकरी २५ ते ३० क्विंटल असे भरघोस उत्पन्न काढून आठ ते दहा हजार रुपये क्विंटल भावाने विक्री करीत आहेत. जिल्ह्यात हळदीला मोठी मागणी नसली तरी सांगली व सातारा या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तेथील व्यापारी थेट शेतात येऊन हळदीची खरेदी करतात. 
 
अशी करतात हळदीची लागवड 
साधारण ४० ते ५० ग्रॅमचे मातृकंद व फिंगर मिक्स कंद मातीच्या बेडवर सात-आठ इंच खोल जून महिन्यात लागवड केली जाते. नऊ महिन्यांच्या कालावधीत खताच्या तीन मात्रा दिल्या जातात. बुरशीनाशक फवारणी केली जाते. एकरी दहा क्विंटल कंद लागतात. त्याची ओळख हिरवा पाला पिवळा झाल्याने खाली पडला की हळद पक्व झाल्याचे समजते. काढलेली हळद बॉयलिंग केली जाते. त्यानंतर पंधरा दिवस सुकविली जाते. मशिनवर पॉलिश करून पिवळी चमक आल्यावर विक्रीसाठी पाठविली जाते. 
 
दहा वर्षांपासून हळद पिकाची लागवड करीत आहे. सुरवातीला लागवडप्रसंगी अनेक अडचणी आल्या. त्यातून मार्ग काढत व तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आज हळद पिकातून भरघोस उत्पादन घेत आहेत. स्वतःचे बॉयलिंग व पॉलिश मशिन असल्याने पाहिजे त्या वेळेस प्रक्रिया करून भाव वाढल्यानंतर हळद विक्री केली जाते. 
-विठोबा माळी, प्रयोगशील शेतकरी, जयनगर 

संपादन- राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news farmer ten year production turmeric