
शासकीय घरकुल बांधकाम योजनेमुळे एकाच कुटुंबातील चार-पाच सदस्यांना गरज नसताना घरकुल मंजूर झालेले आहे. परिणामी जिकडे जागा मिळेल तिकडे घरकुल बांधकाम करत सुटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
म्हसावद (नंदुरबार) : येथे वाढते अतिक्रमण ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत असून, ज्याला पटेल तिकडे बांधकाम करत सुटले आहेत. एकाने तर चक्क रस्त्यावरच घरकुल बांधकाम करण्यास सुरवात केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ते बांधकाम त्वरित बंद करावे, यासाठी ६१ ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन दिले.
शासकीय घरकुल बांधकाम योजनेमुळे एकाच कुटुंबातील चार-पाच सदस्यांना गरज नसताना घरकुल मंजूर झालेले आहे. परिणामी जिकडे जागा मिळेल तिकडे घरकुल बांधकाम करत सुटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, नवीन प्लॉट भागात २०-२५ वर्षांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यावरच एकाने चक्क घरकुल बांधकाम सुरू केले. हा रस्ता सेंट्रल बँक, डीडीसीसी बँक, म्हसावद विविध कार्यकारी सहकारी संस्था, साईबाबा सहकारी पतसंस्था, सती गोदावरीमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डी. एड. महाविद्यालय, प्राथमिक शाळा, म्हसावद फाटा याकडे जाणारा जवळचा एकमेव रस्ता आहे. रस्त्यातील बांधकाम पाहून त्या भागातील ६१ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारी निवेदन देऊन बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.
घरासमोर आणून ठेवले दुकान
एकाने बाजारपेठ भागात रहिवासी घरासमोर चक्क दहा बाय दहाचे दुकानच आणून ठेवले. बाजारपेठ भागातील ग्रामस्थांनी उचलून हनुमान चौकात ठेवले. सकाळी सरपंचांनी तलाठी कार्यालयाच्या रस्त्यावर ठेवले. दरम्यान, म्हसावद गावाला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. त्या भागातील निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्यही बोलायला तयार नाहीत.
चौक होताय गायब
गावात वाढणारे पक्के अतिक्रमण, कोठेही टपऱ्या, पत्र्याची दुकाने ठेवून भाडेतत्त्वावर देण्याची कुपद्धत सुरू झाल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असा खेळ सुरू आहे. गावातील रस्ते अरुंद झाले आहेत, तर चौक अतिक्रमणामुळे गायब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे घाणीचे साम्राज्यही वाढत आहे. गावातील सर्व अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे