esakal | सात एकर शेतातील अफूची कापणी; पोलिसांचा खडा पहारा

बोलून बातमी शोधा

police action}

बाहेरून येऊन वसलेल्या मेंढपाळांना ही शेती एकरी २५ हजार रुपये, याप्रमाणे चार महिन्यांसाठी भाडे कराराने दिली आहे. तेच ही शेती करत असल्याचे सशयितांनी सांगितले असले, तरी शेतमालकाला याबाबत माहिती नसणे शक्यच नाही.

सात एकर शेतातील अफूची कापणी; पोलिसांचा खडा पहारा
sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : फत्तेपूर गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील शिरूडतर्फे हवेली (ता. शहादा) शिवारात सुमारे सात एकर अफूची शेती पोलिसांनी धाड टाकून उद्‌ध्वस्त केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. ७० मजुरांकडून अफूची झाडे कापण्याचे काम सुरू असून, मंगळवार (ता. ९) पर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचे मोजमाप करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. 
अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तर महसूल विभागाचे पथकही दाखल झाले आहे. लाखोंच्या घरात किंमत असलेल्या या अफूच्या शेतीने पोलिसही चक्रावून गेले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना फत्तेपूरपासून पुढे दुर्गम भागात अफूची शेती असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी रविवारी (ता. ७) सायंकाळी पाचच्या सुमारास शहाद्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पवार यांनी मोठ्या फौज-फाट्यासह शिरूड त. ह. शिवारात धाड टाकली. या धाडीत सुमारे सात एकर क्षेत्रांत अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्याने नामी शक्कल लढवून शेतात आजूबाजूला मका, तर आतमध्ये अफूची लागवड केल्याचे दिसून आले. अफूचे पीक पूर्ण तयार झाल्याचे आढळून आल्याने पोलिसही चक्रावून गेले. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी सायंकाळीच दोघांना ताब्यात घेतले, तर रात्री उशिरा आणखी एकास ताब्यात घेतले आहे. 

खडा पहारा..
या ठिकाणी रविवारी रात्रभर पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात आला होता. सोमवारी सकाळी अकरापासून ७० मजुरांकडून अफूची झाडे कापण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सात एकर क्षेत्रांत त्याची लागवड असल्याने आज हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्या मुळे हे काम पूर्ण झाल्यानंतरच पंचनामा व मोजमाप करून बाजारभावानुसार त्याची आजची किंमत किती होऊ शकते, याचा अहवाल तयार होईल व त्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतीचे मोजमाप करण्यासाठी महसूल विभागाचे पथकही दाखल झाले आहे. 

रॅकेट असण्याची शक्यता 
दरम्यान, ही शेती स्थानिक काका-पुतण्याच्या नावावर असून, त्यांनी काही महिन्यांपासून बाहेरून येऊन वसलेल्या मेंढपाळांना ही शेती एकरी २५ हजार रुपये, याप्रमाणे चार महिन्यांसाठी भाडे कराराने दिली आहे. तेच ही शेती करत असल्याचे सशयितांनी सांगितले असले, तरी शेतमालकाला याबाबत माहिती नसणे शक्यच नाही. त्यामुळे अफूची शेती करणारी मोठे रॅकेट यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका ग्रॅमवर किंमत ठरणारी अफूची सात एकरातील या शेतीतील अफूचे पीक पूर्ण तयार झाले असून, त्याची किंमत कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाला चक्रावून टाकणाऱ्या या अफूच्या शेतीमधील मास्टरमाइंड कोण, त्यामागे असलेले रॅकेट याचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे