
१५ दिवसांपूर्वी मेलेल्या सात वर्षांच्या बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला होता. या संदर्भात वन विभागाने चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी रविवारी (ता. २०) पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
विसरवाडी (नंदुरबार) : चिंचपाडा (ता. नवापूर) वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घृणपणे शिकार करण्यात आली. मेलेल्या पशूच्या मांसात विषप्रयोग करून या दोन्ही नर व मादी बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचा संशय वन विभागाला आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिकारीनंतर दोन्ही बिबट्यांच्या अंगावरची कातडी काढण्यात आली असून, मोठे दात, मिश्या, त्यांचे चारही पंजेही कापून टाकण्यात आले आहेत. विक्रीसाठी पंजे आणि त्यांचे खाल काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
१५ दिवसांपूर्वी मेलेल्या सात वर्षांच्या बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला होता. या संदर्भात वन विभागाने चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी रविवारी (ता. २०) पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयितांकडे चौकशी केली असता दुसरा बिबट्या मृतावस्थेत जमिनीत पुरल्याची माहिती समोर आली. त्या बिबट्याचे पुढील दोन पंजे तोडलेले दिसून आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढून त्याचा पंचनामा करून पेटविण्यात आले. तिसरा मेलेल्या बिबट्या असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. परंतु वन विभागाला तिसरा दिसून आला नाही.
वन विभागाची शोधमोहीम
गडदाणीच्या जंगलात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. अनेक पशुधन फस्त केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्या अनुषंगाने काही लोकांनी बिबट्याला मांसात विषारी औषध टाकून मारण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या संदर्भात उपवनसंरक्षक सुरेश कवटे, सहाय्यक वनसंरक्षक डी. जी. पवार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा आर. बी. पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पशुधन अधिकारी डॉ. योगेश गावित, मंडळाधिकारी बी. एन. सोनवणे, तलाठी जी. एस. तडवी, नवापूर चिंचपाडा, शहादा, नंदुरबार वन विभागाचा पन्नासहून अधिक कर्मचारीवर्ग घटनास्थळी दाखल होता. वन विभागाची जंगलात शोधमोहीम सुरू आहे.
संपादन ः राजेश सोनवणे