esakal | वाळू वाहतूकदाराची मुजोरी; महिला तलाठ्यास मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

valu chori issue

वाळू वाहतूकदाराची मुजोरी; महिला तलाठ्यास मारहाण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : वाळू वाहतूक करण्याबाबत दहा टक्के खनिज विकास निधी पासची विचारणा केल्याच्या कारणावरून नंदुरबार येथील एका भाजप नगरसेवकाने (Nandurbar bjp corporator) वाळू वाहतूक तपासणी पथकातील महिला तलाठ्यास मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा (Nandurbar police) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनासह चालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आदिवासी संघटनांकडून नगरसेवकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर भाजप नगरसेवकांनी मात्र मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे. (nandurbar-leady-officer-police-complent-heat-palika-member)

नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत गुजरात राज्यातील वाळू घाटातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयाकडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. नंदुरबार तहसील कार्यालयातील वाळू तपासणी पथकातील वैंदाणे येथील महिला तलाठी रूपाली डोंगरदिवे, खामगाव येथील तलाठी व्ही. पी. काकुळदे, पर्यवेक्षाधिन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत लोखंडे यांच्यासह महिला तलाठी निशा पावरा या शनिवारी (ता. ५) सकाळी नऊच्या सुमारास वाहनांची तपासणी करत होते. या वेळी वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच ३९, एडी ०९६६) आले असता चालकास पथकातील कर्मचाऱ्यांनी रॉयल्टीबाबत विचारणा केली. त्या वेळी त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मात्र रॉयल्टी पास दाखविली. चालकास पथकातील कर्मचाऱ्यांनी दहा टक्के खनिज विकास निधी पासची विचारणा केली असता, त्याच्याकडे ती आढळून आली नाही. यावेळी डंपरचालकास वाहन तहसील कार्यालयात जमा करण्याचे सांगितले असता, त्याने मालक येत असल्याचे सांगून वाहन सोडून पसार झाला.

हेही वाचा: नंदुरबार जिल्‍हा अनलॉक; सर्व व्यवहार होणार सुरळीत

दीड तास पाहिली वाट

सुमारे दीड तासापर्यंत कोणीही आले नाही. दरम्यान, पथकातील कर्मचाऱ्यांनी दोन डंपर व एक ट्रक, असे तीन वाहन नंदुरबार तहसील कार्यालयात जमा केली. अकराच्या सुमारास घटनास्थळी डंपरमालक गौरव चौधरी, डंपर चालक व आणखी काही जण आले. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी संबंधितांना वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. यावेळी पथकातील कर्मचारी व नगरसेवक गौरव चौधरी यांच्यात वाद निर्माण झाला.

नगरसेवकाची महिला तलाठीस धक्‍काबुक्‍की

चालकाने डंपर करण चौफुलीकडे नेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांनी शासकीय वाहनाने त्याचा पाठलाग करून उड्डाणपुलाशेजारील मिरची पथारीवर डंपर अडविले. यावेळी महिला तलाठी निशा पावरा व नगरसेवक गौरव चौधरी यांच्यात वाद निर्माण झाला. घटनास्थळी गौरव चौधरी यांनी निशा पावरा यांना धक्काबुक्की करून अश्लील, जातिवाचक शिवीगाळ करीत कानशीलात मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून संशयित गौरव चौधरी, डंपरवरील चालक व गौरव चौधरी यांच्या वाहनावरील चालक अशा तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अ. प्र. कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी प्रभारी पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक निरीक्षक दिगंबर शिंपी, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गणेश सूर्यवंशी यांनी भेट दिली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन हिरे तपास करीत आहेत. दरम्यान, डंपरचालक व वाहनास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

loading image