कुपोषणमुक्तीत नंदुरबार देशात चमकले 

malnutrition
malnutrition

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात झालेले कुपोषणमुक्तीचे काम देशभरात चांगले असल्याचे सर्वेक्षणाच्या अहवालावरून स्पष्ट होते. याचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांना असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावित यांनी बुधवारी (ता.१७) येथे केले. 
‘न्युट्रिशन इंडिया’ कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व पोषण विषयावर कार्यशाळा झाली. उद्घाटन खासदार डॉ. गावित यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे कार्यक्रम अधिकारी निलेश गंगावणे, कुपोषणमुक्त नंदुरबार अभियानाच्या प्रमुख डॉ. नवनीता रुद्रा आदी उपस्थित होते. 
खासदार डॉ. गावित म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील बालक आणि महिलांच्या आरोग्य व पोषणसंबंधी सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लॅन इंडियाकडून २०१९ मध्ये न्युट्रिशन इंडिया कार्यक्रम हा पथदर्शी प्रकल्प नंदुरबार व अमरावती जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील १०० गावांमध्ये २२ समुदाय पोषण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे. लहान मुलांना पोषण पुनर्वसन केंन्द्रात दाखल करणे, गर्भवती महिलांना संस्थागत प्रसूती व इतर आरोग्य सुविधांचा लाभ देणे, आदिवासी महिलांमध्ये पोषण, आरोग्य सेवा आणि सवयींबद्दल जनजागृती करुन कुपोषण व आरोग्य निर्देशांकात सुधारणा घडवून आणणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. 
 
राईडर महिलांचे कौतुक 
जनजागृतीसाठी दिल्ली येथून १६०० किलोमीटरचे अंतर पार करुन आलेल्या ७ बाईक राईडर महिलांचे डॉ. भारुड यांनी कौतुक केले. ते म्हणाले, दुर्गम भागातील कर्मचारी गर्भवती मातांचे प्रबोधन आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी चांगले प्रयत्न करीत आहेत. येणाऱ्या वर्षात अधिक कुपोषणमुक्तीच्या क्षेत्रात अधिक चांगले होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांचे आणि कामांचे विश्लेषण करून त्यात गरजेनुसार आवश्यक बदल करावा, अशी सूचना त्यांनी केली. खासदार गावित यांच्या हस्ते समुदाय पोषण कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.  

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com