पंधरा वर्षानंतर बर्ड फ्लूची पुन्हा तिच परिस्‍थिती; कोंबड्यांचे किलिंग सुरू

विनायक सुर्यवंशी
Sunday, 7 February 2021

नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममध्ये प्रमाणापेक्षा अधिक कुकुटपक्षांचा मृत्यु संसर्गजन्य आजाराने होत आहेत. चार पोल्ट्री फार्म मधील मृत पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथे रोगाच्या निदानासाठी पाठवण्यात आले होते.

नवापूर (नंदुरबार) : शहरातील चार पोल्ट्री फार्ममधील पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लु या आजाराने होत असल्याने आज प्रशासन कोंबड्यांची विल्हेवाट लावत आहेत. पंधरा वर्षांनी जिल्ह्यात बर्ड फ्लु या संसर्गजन्य आजाराचा पुन्हा शिरकाव झाला आहे. आज जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा नवापूर परिसरात दाखल झाली आहे. अधिकारी आणि कर्मचारी युद्ध स्तरावर कामाला लागले आहेत. आज डायमंड पोल्ट्री फार्मच्या केवळ दोन किंवा तीनच शेडमधील कोंबड्यांचे किलिंग होणार आहे.

नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममध्ये प्रमाणापेक्षा अधिक कुकुटपक्षांचा मृत्यु संसर्गजन्य आजाराने होत आहेत. चार पोल्ट्री फार्म मधील मृत पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथे रोगाच्या निदानासाठी पाठवण्यात आले होते. अहवाल शनिवारी (ता .6) सायंकाळी प्राप्त झाले. नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लुने झाल्याचे सर्व प्रथम जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी अधिकृत घोषणा केली.

अशी लावली जातेय विल्‍हेवाट
चार पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोबड्यांची किलिंग करून शास्रोक्त पद्धतीने खड्डे करून विविध प्रकारचे औषधीचा उपयोग करत प्रशासनाच्या वतीने दफन करण्याची सुरुवात झाली आहे. तर या फार्मच्या परिसरातील 12 अन्य पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोंबड्या देखील धोकादायक क्षेत्रात समावेश झाला आहे. एकट्या नवापुर तालुक्यात 27 पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास साडे नऊ लाख कुकुटपक्षी आहेत. या निर्णयाने कुकुटपालन व्यायसायीकांचे मात्र कोट्यवधीचे नुकसान होणार असुन 2006 च्या बर्ड फ्लुनंतर उभारी घेत असलेला हा व्यवसायाचे पुन्हा कंबरडे मोडले जाणार आहे. कोबड्यांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसात पशुसंवर्धन विभागाचे जवळपास शंभर पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले आहेत. 

चार कुक्कुटपालन पालन व्यवसायातील कोंबड्यांचा मृत्यू आणि त्यानंतर आलेला अहवाल लक्षात घेता उर्वरित 20 ते 22 पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचे नमुने आज घेण्यात येणार आहेत. तपासणी साठी भोपाळ येथे पाठवून रिपोर्ट पॉझिटिव आल्यास किलिंग ऑपरेशनला सुरुवात करण्यात येईल. रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी अपेक्षित दक्षता घ्यावी लागेल. 
- डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी नंदुरबार

कुक्कुटपालन पालन व्यवसायातील पक्षाचा मृत्यू बर्ड फ्लु ने होत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभे राहिले आहे. 
प्रशासना कडून एक पक्षी मागे 90 रुपये मोबदला देणार आहे. प्रशासनाच्या मोबदल्या वर नाराजी व्यक्त करत आम्हाला एक पक्षी मोठा करण्यासाठी जवळ जवळ चारशे रुपये खर्च येतो. सदर मोबदला मिळणार असला तरी आमच्या व्ययसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
- आरिफभाई बलेसरिया, नवापूर पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष, 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news navapur bird flu killing of hens continues