गहू, तुरीवर अळी..मग या फवारण्या आवश्‍यक; धुके व पावसाचा परिणाम

विनोद सूर्यवंशी
Saturday, 19 December 2020

गव्हाला पोषक थंडी नसल्यामुळे वाढ खुंटली आहे. गव्हाचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही भागात गव्हावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

नवापूर (नंदुरबार) : शहरासह तालुक्यात मागील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसाची कमी म्हणून की काय आता धुक्याने तालुका व्यापला आहे. अधून- मधून पाऊस, ढगाळ वातावरण व धुक्यामुळे रब्बी पिकांवर मुख्यत्वे गहू, तूर आणि हरभरा पिकांवर विपरित परिणाम होत आहे. थंडी देखील येते आणि पुन्हा गायब होते अशा बदलत्या हवामानामुळे शेतकरी धास्तावले आहेत. 
पाऊस झाल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला. मागील आठवड्यात थंडी जाणवू लागली होती. दिवसभर उन्हाचे चटके बसतात तर सायंकाळपासून झोंबणारी थंडी वाढते. दोन- तीन दिवस वातावरणात हिवाळा जाणवतो; तर मध्येच अचानक थंडी गायब होते आणि उष्मा जाणवू लागतो. ढगाळ वातावणामुळे देखील थंडी गायब होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. मागील रविवारी थंडीच्या वातावरणात फरक पडला. थंडी काहीसी कमी झाली. आता पुन्हा थंडीचा गारठा वाढू लागला आहे. पावसाचा, ढगाळ वातावरणाचा आणि आता धुक्याचा परिणाम शेतीतील रब्बीच्या पिकांवर होत आहे. शेतशिवारात सध्या गव्हाचे पीक चांगले बहरात आले आहे. काही ठिकाणी तुरीचे पीकही काढणीला आलेले आहे. तर हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शेतकऱ्यापुढे संकटच
यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. मात्र, परतीच्या पावसाने तेही हातचे गेले. आता रब्बी हंगाम पाण्याच्या मुबलकतेने चांगला जाईल. अशी आशा बाळगून असलेला शेतकरी वर्ग चांगलाच धास्तावला आहे.

तूर काळवंडली
ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा काळ्या पडत असल्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतित झाला आहे. तूर काळी पडली तर मालाची प्रतवारीवर परिणाम होतो. परिणामी बाजारात दरही घसरतो. लागवडीपासून ते फवारणी ते बाजारात पोहचेपर्यंत तुरीच्या पिकावर बराच खर्च करावा लागतो. काळसर तुरीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. परिणाम शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही पडणार नाही, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गव्हाची वाढ खुंटली
गव्हाला पोषक थंडी नसल्यामुळे वाढ खुंटली आहे. गव्हाचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही भागात गव्हावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गव्हाच्या पिकाला थंडीचे वातावरण पोषक असते. थंडीमुळेच ओंबीत दाणे भरले जातात. मात्र, ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब होते आणि त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. रब्बीतील इतरही पिकांवर कमी- अधिक प्रमाणात ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची भिती आहे.

या फवारण्या कराव्यात
तुरीवर शेंगमाशी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी इमामेक्टीन बेन्झाएट 5 एसजी 10 लिटर पाण्यात 4.5 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 10 लिटर पाण्यात 3 मिली फवारावे. गव्हावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यामुळे शिफारशीनुसार किटकनाशकाची फवारणी करावी. हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्विनॉलफॉस 20 ईसी 10 लिटर पाण्यात 20 मिली अशी फवारणी करावी. 

- बापू गावीत, तालुका कृषी अधिकारी, नवापूर 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news navapur effect fog and rain in wheat larvae on trumpet