गायींचा अचानक जोरात हंबरडा; महामार्गावर नागरीकांची धाव पाहिले तर रक्‍तच रक्‍त

विनायक सुर्यवंशी
Monday, 4 January 2021

पहाटेची वेळ असल्‍याने अनेकजण गावात साखर झोपेत तर अनेकजण उठून दारासमोर बांधलेल्‍या गुरांना चारा टाकत होते. अशात महामार्गावर काहीतरी जोरदार आवाज आला आणि रस्‍त्‍यावर बसलेल्‍या मोकाट गुरांच्या हंबरडा सुरू झाला. ग्रामस्‍थ त्‍या दिशेने धावत गेले पाहिले तर रस्‍त्‍यावर रक्‍तच रक्‍त दिसून आले.

नवापूर (नंदुरबार) : नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गवर रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिल्याने या अपघातात सात गायींना गंभीर दुखापत झाली. यातील दोन गर्भवती गायींचा मृत्यू झाला असून ट्रक चालक मात्र वाहनासह फरार झाला. 

विसरवाडी (ता. नवापूर ) येथे मोकाट जनावरे महामार्गालगत बसलेली असतात. या दरम्‍यान रविवारी पहाटेच्या सुमारास मोकाट जनावरे बसलेली असताना अज्ञात वाहनचालक सुसाट वेगाने महामार्गावरून निघाला. यात महामार्गालगत बसलेल्‍या जनावरांना देखील दुर्लक्ष करत त्‍यांना धडक देत पुढे मार्गस्‍थ झाला. या धडकेत कळपातील पाच गायींना व दोन वासरे चिरडली गेली. अत्यंत निर्दयपणे धडक दिल्याने गंभीर दुखापत झाली आहे. 

पाय अन्‌ मान कापल्‍याने रस्‍त्‍यावरून वाहत होते रक्‍त
वाहनचालकाच्या बेजबाबदारपणामुळे वाहनाची चाक दोन गायींच्या पायावरून गेल्याने जायबंदी झाले. तर वाहनाच्या समोरील भाग धडकल्याने तीन गायींच्या मानेचा भाग चिरला गेला आहे. शिंगे व पाय जायबंदी होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. यावेळी महामार्गावर जखमी अवस्थेत अनेक जखमा व दोन्ही पाय जायबंदी झालेले जनावरे पडलेले दिसून आल्याने काही युवकांनी घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना दिली. 

गोसेवक धावले 
अपघातामुळे रस्त्यावर पडलेल्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये; म्हणून गोसेवक किरण समुद्रे, समीर खाटीक, श्याम गावित, सुरेश टिमल्या, सचिन जाधव या युवकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या जखमी अवस्थेतील गायींना रस्त्याच्या बाजूला केले. यानंतर विसरवाडी पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी श्री. राठोड यांना बोलावून जखमी गायींवर पहाटे साडेपाचच्याच सुमारास औषधोपचार करण्यात आले. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात आमीन बशीर शेख (रा. विसरवाडी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावित पुढील तपास करीत आहे. विसरवाडी ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेलेल्या गायींचा अतिंम विधी करण्यात आला. या घटनेमुळे विसरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news navapur nagpur surat highway accident cow injured