
मागील पंधरा दिवसात 20 ते 22 हजार कोंबड्या मृत्यू झाल्याचे मंडळ अधिकाऱ्यांचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे.
नवापूर (नंदुरबार) : शहरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सर्वात अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा पशुसवर्धन उपायुक्त यांच्या पथकाने आज कुक्कुटपालन शेडची पाहणी केली. ठिकठिकाणाहुन मृत कोंबड्याचे नमुने घेऊन तपासणी करिता पुण्याला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नवापूर तालुका परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला.
नवापूर तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारीच्या पथकाने 2 फेब्रुवारीला डायमंड पोल्ट्री फार्मचा पंचनामा केला. मागील पंधरा दिवसात 20 ते 22 हजार कोंबड्या मृत्यू झाल्याचे मंडळ अधिकाऱ्यांचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे.
कोंबड्या मृत्यूचे प्रमाण वाढले
नाशिक आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या आदेशनुसार आज सकाळी जिल्हा पशुसवर्धन उपायुक्त डॉ. के. डी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यु. डी. पाटील, नवापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक वळवी यांच्यासह विभागाचे कर्मचारी यांनी शहरातील बहुतेक पोल्ट्री फार्मवर तपासणी केली. मृत कोंबड्याचे नमुने घेऊन पुणे येथील लॅबला पाठवले असल्याची माहिती दिली. नवापूर परिसरातील पाच ते सहा पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या मरण्याचे प्रमाण वाढले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पाटील यांनी सांगितले.
वीस हजाराच्या आकड्याने चिंता
तहसीलदार मंदार कुळकर्णी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका पोल्ट्री फार्ममध्ये 15 दिवसात वीस ते बावीस हजार कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले. यामुळे 2 फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास करंजी ओवारा येथील एका पोल्ट्री फार्मचा पंचनामा केला. राणीखेत आजाराने कोंबड्या मरत असल्याचे प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला असला तरी बर्ड फ्लूची टांगती तलवार पोल्ट्री व्यवसायिकांवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर आहे. हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने व्ययसायिकामध्ये चिंतेत आहेत.
दहा किमी भागात अलर्ट झोन
नवापूर परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म आहेत. मागील पंधरा दिवसांपासून कोंबड्यांच मृत्यू झाले. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याने नवापूर शहरासह दहा किमीच्या परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.
नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्ममधील सरासरी प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू होत आहे, ही बाब चिंता जनक आहे. याबाबत सर्वच पोल्ट्री फार्म मालकांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मृत कोंबड्यांचे नमुने पुण्याला तपासणी करीत पाठविण्यात येतील. अहवाल प्राप्त झाल्यावर रोगाचे निदान होईल, तो पर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. के. डी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त.
संपादन ः राजेश सोनवणे