
निनावी तक्रारीवरून चौकशी दरम्यान 20 ते 25 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले होते. प्रशासनाने दखल घेत केलेल्या कारवाईमुळे उजेडात आलेले हे प्रकरण पोल्ट्री व्यावसायिकांनी माहिती न दिल्यामुळे त्यांच्या अंगलट आले
नवापूर (नंदुरबार) : तालुक्यातील पोल्ट्री फार्मच्या हजारो कोंबड्यांचा संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला. कुक्कुटपालन व्यवसायिकांनी मृत कोंबड्यांबाबत प्रशासनास कोणतीही माहिती कळवली नाही. मृत पक्षांची शास्रोक्त पद्धतीचा अवलंब न करता परस्पर विल्हेवाट लावून संसर्ग साथीचे रोगाबाबत हयगय केल्याप्रकरणी पशुसंवर्धन विभागाने एका पोल्ट्री फार्मच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर चार पोल्ट्री फार्मला शील केले.
साथरोग अधिनियम कलमसह प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गित रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 चे कलम 43 प्रमाणे नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रशासन अलर्ट आहे.
वीस हजाराहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू
निनावी तक्रारीवरून चौकशी दरम्यान 20 ते 25 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले होते. प्रशासनाने दखल घेत केलेल्या कारवाईमुळे उजेडात आलेले हे प्रकरण पोल्ट्री व्यावसायिकांनी माहिती न दिल्यामुळे त्यांच्या अंगलट आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक वळवी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आज नवापूर पोलिस ठाण्यात डायमंड पोल्ट्री फार्मचे संचालक सुरेश दुल्लभ भाई प्रजापत (रा नवापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
तर मानवी आरोग्याला धोका
सुरेश प्रजापत यांनी त्यांचे पोल्ट्री फार्ममध्ये 70 ते 75 हजार कुकुट पक्षांचे सहा शेड आहेत. 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत कोंबड्यांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली. या आजारामुळे 20 ते 22 हजार कुकुट पक्षी मरण पावले. या संसर्गजन्य आजारामुळे मानवी आरोग्य व प्राण्यांच्या जीवितास संसर्ग होऊन अपाय होऊ शकतो. याची जाणीव असतांना सुद्धा त्यांनी संसर्गामुळे मृत कुकुट पक्षाबाबत प्रशासनास कोणतीही माहिती कळवली नाही. पक्षाची शास्रोक्त पद्धतीचा अवलंब न करता परस्पर विल्हेवाट लावून संसर्ग साथीचे रोगा बाबत हयगय केल्या प्रकरणी साथरोग अधिनियम कलमासह प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गित रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 चे कलम 43 प्रमाणे नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार फार्म केले सील
नवापूरमधील एका फॉर्म विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार फार्मला सील करण्यात आले आहे. यामध्ये डायमंड पोल्ट्री फार्म, वसीम पोल्ट्री फार्म, आमलिवाला पोल्ट्री फार्म, परवेज पठाण पोल्ट्री फार्म यांना रात्री (ता. 3 ) उशिरापर्यंत सील करण्यात आले. तसेच सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी तातडीने निर्णय घेत 22 गावांना एलर्ट घोषित केला आहे.
संपादन ः राजेश सोनवणे