esakal | हॉटस्पॉट ठरलेली गावे नियंत्रणात

बोलून बातमी शोधा

corona hotspot
हॉटस्पॉट ठरलेली गावे नियंत्रणात
sakal_logo
By
टिम इ सकाळ

नवापूर (नंदुरबार) : तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पाट ठरलेली गावे कोरोना नियंत्रित झाली आहेत, तर ७२ गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी यांनी दिली. सोमवारी (ता. २६) तालुक्यातील २०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले.

नवापूर तालुक्यातील पळसून गावात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, तर कुंकराण गावात २३ रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यामुळे संपूर्ण तालुका प्रशासन हादरले होते; परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने पळसून व कुंकराण कोरोनामुक्त झाले आहे. एकालाही ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासली नाही. नवापूर तालुक्यात आतापर्यंत तीन हजार ५७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातून दोन हजार ५८७ रुग्ण बरे झाले, तर ९३८ रुग्ण उपचार घेत आहेत. ५१ जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत आहे. मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.

५ एप्रिलला प्राथमिक आरोग्य केंद्र, पळसून येथे कोरोना टेस्टिंगमध्ये गावातील ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर कुंकराण गावात २३ रुग्ण होते. रुग्णांना उपचारासाठी नवापूर रुग्णालयात पाठविले, तर काहींना लक्षणे नसल्याने शेतातच क्वारंटाइन केले होते.

विलगीकरण कक्षात उपचार

पळसून प्राथमिक आरोग्याधिकारी डॉ. योगेश वळवी व कर्मचारी तसेच पळसूनचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ यांनी मिळून गावातच जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष तयार केला व ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर औषधोपचार सुरू केले. पूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. मास्क, सॅनिटायझर ग्रामपंचायतीतर्फे पूर्ण गावात वाटप करण्यात आले. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या आदेशाने गाव बंद केले. गावातील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे दिली होती. संपूर्ण गावातील ४५ रुग्ण कोरोना नियंत्रित झाले. या प्रकारे सर्व रुग्णांची प्राथमिक अवस्थेत कोरोना टेस्ट झाल्यामुळे कोणालाही ऑक्सिजन किंवा रेमडेसिव्हिरच्या उपचाराची गरज भासली नाही, असा दावा सरपंच संतोषकुमार गवळी यांनी केला.

इतर गावांसाठी उत्तम उदाहरण

पळसून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग, डॉक्टर, नर्स, शिक्षक, ग्रामस्थ यांनी योग्य नियोजन केल्याने कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यातील या गावांत खबरदारीचे योग्य नियोजन झाल्याचे दिसून आले. पळसून व कुंकराण गाव कोरोना नियंत्रित होऊन इतर गावांनी कोरोनावर कशी मात करावी याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. ज्या गावातील स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष असतील तर त्या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांसह इतर सुविधेची कमतरता जाणवत नाही. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशाच पद्धतीने ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.