esakal | कष्‍टकरी आजीबाईची गाथा..वय झाले पण थकल्‍या नाहीत; पिकविले ॲपल बोर 

बोलून बातमी शोधा

farmer}

निसर्गाने साथ दिलीच, तर ४० हजारांपर्यंत उत्पन्न येई. उत्पन्नाच्या तुलनेत होणारा खर्च आणि कष्ट अधिक होते. त्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला.

कष्‍टकरी आजीबाईची गाथा..वय झाले पण थकल्‍या नाहीत; पिकविले ॲपल बोर 
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : विमलबाई पाटील यांचे वय अधिक असले तरी त्या थकलेल्या नाहीत. अजूनही त्या शेतकामात लक्ष घालतात. शेतीविषयी भरभरून बोलतात. कापूस लावून फारसे उत्पन्न मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड केली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी बागेसाठी कष्ट घेतले आणि आसाणे गावात विमलबाईंची ॲपल बोरांची बाग उभी राहिली. 

दोन हेक्टरचे क्षेत्र, आतापर्यंत कापूस उत्पादन घेतले. अधिक कष्ट घेऊनही उत्पन्न मात्र मर्यादित होते. निसर्गाने साथ दिलीच, तर ४० हजारांपर्यंत उत्पन्न येई. उत्पन्नाच्या तुलनेत होणारा खर्च आणि कष्ट अधिक होते. त्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. एक हेक्टर क्षेत्रात त्यांनी ॲपल बोराची लागवड केली. पहिल्या वर्षी आलेला बहार काढून टाकला. दुसऱ्या वर्षापासूनच त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली. गतवर्षी ६० हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्यासोबत अकुशल मजुरीचे ६८ हजार रुपये आणि रोपांसाठी १७ हजार रुपयेदेखील मनरेगाच्या माध्यमातून मिळाले आहेत. या वर्षी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असले तरी साधारण ५५ क्विंटल बोरे सुरत आणि पुण्यातील व्यापाऱ्यांनी नेली आहेत. 

अशी फुलविली शेती 
आजींनी शेतात मनरेगातून गांडूळ खताची टाकी तयार करून घेतली आहे. त्यासाठी पाच हजार ८०० रुपये मजुरीचे मिळाले. साधारण सहा हजार रुपये किंमत असलेले गांडूळ खत शेतासाठी अवघ्या काही महिन्यात उपलब्ध झाले आहे. योजनेतून शेतात सिंचन विहीर तयार करण्यात आली असून, पाइपलाइनद्वारे पाणी शेतात आणले आहे. विहिरीसाठी एक लाख ९६ हजार अकुशल कामासाठी आणि ८३ हजार कुशल कामासाठी खर्च मनरेगामधून देण्यात आला. फळबाग लागवड फायदेशीर ठरत असल्याने या वर्षी बांधावर २० आंब्याची झाडे लावली आहेत. त्यासाठीदेखील योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. फळबाग लागवड केल्यानंतर आंतरपीकदेखील घेता येत असल्याने उत्पन्न वाढण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत. या वर्षी मुगाचे उत्पादन घेणार असल्याचे विमलबाईंनी सांगितले. 
 
आंतर पिकही घेणार
गेली ३० वर्षे त्या शेतात काम करीत आहेत. अनेक वर्षांचा अनुभव असल्याने फळबाग लागवडीने झालेला फायदा त्यांना लक्षात आला आहे. शेतातील ४०० रोपांची आता छाटणी होऊन आंतरपीक घेतले जाईल आणि पुढच्या मोसमात परत एकदा बहरलेली फळबाग अधिक उत्पन्न देईल, असा विश्वासही त्यांना आहे. गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ७० पेक्षा अधिक फळबाग घेण्याचे नियोजन आहे. तांत्रिक सहाय्यक सदीप वाडिले आणि ग्रामरोजगार सेवक शरद पाटील यांचे मार्गदर्शन असल्याने योजनेच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे प्रमाण वाढते आहे. विमलताईंच्या शेतात यशस्वी ठरलेली फळबाग लागवड इतरांनाही प्रोत्साहन देणारी ठरली आहे. 

कापसाचे उत्पादन घेताना अधिक खर्च करूनही मजूर मिळत नाही. याउलट फळबागेसाठी मजुरांची आवश्यकता नाही. फवारणी लागत नाही. मजुरीमुळे पैसे घरातच राहतात. कापसावर अधिक खर्च करण्यापेक्षा फळबागेचे क्षेत्र वाढविल्याने पावसाचे संकट येऊनही अधिक फायदा झाला आहे. 
-विमलबाई पाटील

संपादन ः राजेश सोनवणे