ही महामंडळाचीच बस..आलीय नव्या रूपात अन्‌ ढंगात, पर्यटन विशेष

निलेश पाटील
Tuesday, 9 February 2021

फाटलेले सीट, काचेच्या खिडकीची तुटलेली तावदाने, गळणारे छप्पर, तंबाखू- पान- गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला कोपरा एसटीची ही मलीन प्रतिमा लवकरच बदलणार आहे.

शनिमांडळ (नंदुरबार) : फाटलेले सीट, काचेच्या खिडकीची तुटलेली तावदाने, गळणारे छप्पर, तंबाखू- पान- गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला कोपरा एसटीची ही मलीन प्रतिमा लवकरच बदलणार आहे. यासाठी प्रशासनाने पहिल्यांदाच पर्यटनासाठी ‘पर्यटन विशेष’ बसची निर्मिती केली आहे. एसटीने पहिल्यांदाच छतावर, आजूबाजूला मोठ्या काचा बसविल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आपल्या सीटवर बसून निसर्गसौंदर्य न्याहाळता येणार आहे. डोंगररांगा किंवा कोकणात या गाडीतून प्रवास करताना प्रवाशांना वेगळा अनुभव येईल. 
पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास अत्यंत सुकर आणि सुविधापूर्ण करता यावा म्हणून दापोलीच्या कार्यशाळेत महामंडळाने ही पर्यटन बस तयार केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर सुविधा दिल्या असून, नक्कीच प्रवाशांना ही बस आवडेल अशा पद्धतीने तिची बांधणी केली आहे. अद्ययावत एअर सस्पेन्शन सुविधा, महिलांसाठी पर्स हुक, चार्जिंग पॉइंट, पर्यटन दिसावे या हेतूने बसला तीन-चार बाजूला मोठ्या काचा बसविल्या आहेत. अधिक प्रकाश गाडीत येण्यासाठी विशिष्ट अंतरावर क्लिअर ग्लास बसविले आहेत. 

नाट्यगृहासारखी आसनव्यवस्‍था
अनेक ठिकाणी ग्रब हँडल दिले आहेत. गाडीत पाय घसरू नये म्हणून अँटी स्कीड स्ट्रीप बसविली आहे. सामान ठेवण्यासाठी नवीन प्रकारच्या पारदर्शक हाय रॅक तयार केल्या आहेत. जाहिरातीसाठी नवीन ग्राब हॅण्डल तयार केले आहेत. विशेष म्हणजे या बसची आसनव्यवस्था नाट्यगृहात जशी खालच्या क्रमांकापासून वरच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होते तशा पद्धतीने व्यवस्था केली आहे. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना बाहेरील सर्व दृश्य सहजपणे दिसणार आहे. शिवाय आत आणि बाहेर आकर्षक स्टिकर्सही लावणार आहेत. 

प्रत्येक विभागाला एक बस 
दापोलीच्या कार्यशाळेत प्रोटोटाईप (नमुना) बस तयार केल्यानंतर राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली आहे. पर्यटनवाढीसाठी ही एसटी वापरली जाणार असल्याने याला नावही पर्यटक बस असेच दिले आहे. बसची क्षमता ४२ सीटांची आहे. एका बससाठी जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचा खर्च आला आहे. लवकरच राज्यातील सर्व विभागात बसचे वितरण होईल. 
 
पर्यटन बस वातानुकूलित आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना आतापर्यंत न दिलेल्या सुविधा या गाडीत दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास स्मरणीय होणार आहे. सर्व विभागात लवकरच ही गाडी दाखल होणार आहे. 
- पी. एन. गुले, विभागीय वाहतूक अधिकारी 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news parivahan mahamandal bus tourist special