esakal | आता ग्रामस्तरीय समितीसमोर धान्यवाटप

बोलून बातमी शोधा

ration
आता ग्रामस्तरीय समितीसमोर धान्यवाटप
sakal_logo
By
टिम इ सकाळ

तळोदा (नंदुरबार) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचे अन्नधान्य मोफत मिळणार आहे. हे अन्नधान्य देताना शिधापत्रिकाधारकास ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य दिल्याची पावती द्यावी लागणार आहे. तसेच अन्नधान्यवाटप ग्रामस्तरीय समितीसमोरच करावे लागणार आहे. तसे निर्देश तहसीलदार गिरीश वखारे यांनी तळोदा तालुक्यातील रेशन दुकानदारांना दिले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावात शासनाने मे व जून महिन्याचे अंत्योदय अन्नयोजनेचे लाभार्थ्यांना प्रतिमहा प्रतिशिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभार्थ्यास प्रतिमहा प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मे महिन्याचे देय असलेले अन्नधान्य शिधापत्रिकाधारकांना देण्यासाठी तळोदा तहसील कार्यालयाने आदेश काढून सर्व रेशन दुकानदारांना निर्देश दिले आहेत.

पावती सांभाळून ठेवावी लागणार

शासनाकडून पुढील महिन्यांसाठी प्राप्त होणारे मोफत अन्नधान्याचे वाटप करताना लाभार्थ्यांना अन्नधान्याची पावती देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटुंब या योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य दिल्यानंतर पॉस मशिनमधून दोन पावत्या काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका पावतीवर लाभार्थ्याला पावतीनुसार धान्य दिले म्हणून पावतीमागे स्वस्त धान्य दुकानदाराने स्वाक्षरी करावी व दुसऱ्या पावतीवर लाभार्थ्यांना नियमानुसार देय असलेले मोफत अन्नधान्य मिळाले म्हणून त्यांची स्वाक्षरी घ्यावी. ही पावती दुकानदारांनी जतन करून ठेवण्याची सूचना दिली आहे. मोफत अन्नधान्याचे वाटप करताना लाभार्थ्यांचे छायाचित्रीकरण व फोटो काढावेत व ग्रामस्तरीय समितीला उपस्थित ठेवूनच मोफत अन्नधान्याचे वाटप करावे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना देय असलेले धान्य नवीन नियमावलीनुसार वाटप करावे लागणार आहे.

थम घेणे बंधनकारक करू नये

कोरोनाच्या महामारीमुळे रेशन दुकानदारांना रेशनवाटप करणे जिकिरीचे जाते. त्यात आधार आधारित थम मशिनवर अंगठा दिल्याशिवाय रेशन देता येत नाही. प्रत्येक लाभार्थ्याचा अंगठा घेतल्यानंतर थम मशिनला सॅनिटाइझ करणे आवश्यक असते. रेशनवाटप करण्यास वेळ लागतो. म्हणून आधार आधारित थम घेणे तूर्तास स्थगित करावे, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे. त्यात आता पॉस मशिनमधून पावती दिली जाणार असल्याने थम घेणे बंधनकारक करू नये, अशी अपेक्षा रेशन दुकानदारांनी केली आहे.