esakal | आयुष्‍यातील दुःख विसरण्यासाठी तिची अनोखी कहाणी; दुर्गम भागात जावून सेवा

बोलून बातमी शोधा

sanitary worker}

आरोग्यसेविका म्हणून घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी अर्थार्जन जरी करीत असल्या तरी त्याला संवेदनांची जोड दिल्याने संगीता यांचे काम वेगळे ठरते. 

आयुष्‍यातील दुःख विसरण्यासाठी तिची अनोखी कहाणी; दुर्गम भागात जावून सेवा
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले, आई- वडिलांचे मायेचे छत्रही नाही, मोठ्या भावाचा मिळालेला आधार तिला लाखमोलाचा असून आपल्या दोन मुलींकडे पाहून तिने स्वतःला सावरत दुर्गम भागातील महिलांमधील रक्तक्षयाची समस्या दूर करण्यासाठी झटताहेत धडगाव तालुक्यातील निगदी उपकेंद्रातील आरोग्य सेविका संगीता शिंदे. 
रुग्णांच्या वेदना कमी केल्यावर मिळणाऱ्या समाधानात आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न संगीता सोनवणे आठ वर्षांपासून करीत आहेत. निगदी उपकेंद्राअंतर्गत वावी आणि बोदला गावे येतात. तिन्ही गावे मिळून १७ पाडे आहेत. काही पाड्यांवर जाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायी चालावे लागते. तर काही पाडे एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. उन असो वा पाऊस, त्या आपली जबाबदारी नीटपणे पार पाडतात. विशेषतः महिलांना पौष्टिक आहार आणि रक्तक्षय टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देतात. 

सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवा
सकाळी साडेआठला त्यांचा दिवस सुरू होतो. भाऊ धनेश शिंदे आपल्या दुचाकीवर त्यांना गावात सोडतो आणि त्यानंतर पायी किंवा मिळेल त्या वाहनाने त्यांचा प्रवास सुरू असतो. लसीकरण, रुग्णांना औषधे देणे, आरोग्य तपासणी अशी कामे करीत सायंकाळी घरी परततात. डोंगराळ भाग असल्याने समस्या सातत्याने येतात. पावसाळ्यात पाड्यांवर भटकंती करणे कठीण असते. अशावेळी नागरिकांना आरोग्य सुविधाही आवश्यक असते. त्यामुळे शक्य त्या पद्धतीने त्या रुग्णांपर्यंत पोहोचतात. नागरिकांना त्यामुळेच संगीता सोनवणे आल्यावर दिलासा मिळतो.

ती आठवण कायम मनात कोरलेली 
हत्तीगव्हाण पाड्यावर गरोदर असलेल्या महिलेला झोळीत टाकून ३ किलोमीटर पायी आणीत तिची सामान्य प्रसूती केल्याची आठवण कायमस्वरूपी त्यांच्या मनात कोरलेली आहे. समाधानाचे अनेक क्षण आरोग्यसेवा देताना येत असल्याचे त्या सांगतात. या भागात असणारी रक्तक्षयाची समस्या दूर करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मातांना प्रसूतीच्यावेळी त्यामुळे मोठ्या समस्येला सामारे जावे लागते आणि जीवालाही धोका असतो. त्यामुळे माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी रक्तक्षयाची समस्या कायमची जावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी किशोरवयीन मुलींना माहिती देण्यात त्यांना आनंद वाटतो. मासिक पाळीसारख्या नाजूक विषयावरही मुलींना मोकळेपणाने माहिती देण्यासोबत आशा सेविकांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन वाटपही करतात. आरोग्यसेविका म्हणून घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी अर्थार्जन जरी करीत असल्या तरी त्याला संवेदनांची जोड दिल्याने संगीता यांचे काम वेगळे ठरते. 

एकदा गरोदर मातेचे एच बी ३ एवढेच होते. तिची प्रसूती सामान्यपणे झाली तेव्हाचा क्षण कायमचा लक्षात राहील. मुलांमधली कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी काही करू शकले, तर आनंद होईल. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य असल्याने चांगले काम करता येते. 
- संगीता शिंदे 
 
संगीता शिंदे यांचे काम चांगले आहे. विशेषत: माता आणि किशोरवयीन मुलींचे समुपदेशन त्या चांगल्याप्रकारे करतात. स्वत: पाड्यांवर जावून आरोग्याच्या समस्या जाणून घेतात. आरोग्यविषयक जागरूकता आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. 
- गुनिता वळवी, सदस्य, पंचायत समिती 

संपादन ः राजेश सोनवणे