
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 18 मार्चपासूनच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नंदूरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे शाळा, महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी मिळाली होती. तर आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांनाही सुरुवात होणार आहे. 27 जानेवारीपासून नंदुरबार जिल्ह्यातील 339 शाळा उघडणार असून यामध्ये कार्यरत असणाऱ्या सुमारे पावणेपाच हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 18 मार्चपासूनच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून ते आजतागायत पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बंदच होते. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना सुरुवात करण्यात आली होती.
शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
जिल्ह्यातील 172 अनुदानित माध्यमिक शाळा, 6 विनाअनुदानित, 87 अंशतः अनुदानित तसेच सीबीएसई, इंग्रजी माध्यम किंवा स्वयंअर्थसहाय्यीत अशा 73 शाळा समाजकल्याण अंतर्गत 2 शाळा तर 78 कनिष्ठ महाविद्यालयांना जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली होती. यावेळी एकूण 5 हजार 845 शिक्षक व 1 हजार 158 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, आता कोरोनोचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने जिल्ह्यातील 284 माध्यमिक शाळा व 78 उच्च माध्यमिक शाळांना सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये कार्यरत असणारे 3 हजार 224 शिक्षक व 1 हजार 465 शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
५६ हजार विद्यार्थी
नंदुरबार जिल्ह्यात पाचवीत 16 हजार 725, सहावीत 19 हजार 184, सातवीत 20 हजार 30 व आठवीमध्ये 23 हजार 828 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत सर्व उपाययोजना करत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात येणार आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे