शहादा परिसरात भुकंपाचा धक्‍का; मध्यप्रदेशात केंद्र

कमलेश पटेल
Saturday, 2 January 2021

भूकंपाचे केंद्र शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असल्याचे समजते. ग्रामीण भागात भूकंपाच्या चर्चेला उधाण आले आहे.

शहादा (नंदुरबार) : शहरासह तालुक्यातील वडाळी, मंदाना, कहाटूळ आदी मंडळातील गावांसह अन्य काही गावात आज दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. सावळदा (ता.शहादा) येथील भूकंपमापन केंद्रात ३.२ रिस्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील एका गावात हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्तुत भूकंपाचे केंद्र शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असल्याचे समजते. या धक्क्यामुळे तालुक्यात कुठेही जीवित व वित्तहानी झाली नसली तरी ग्रामीण भागात भूकंपाच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान शहादयाचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ग्रामीण भागात पाहणी पाहणी करून ग्रामस्थांना सूचना दिल्या.

‘तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. स्थानिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये अफवा पसरू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये; काही जाणवल्यास तातडीने मोकळ्या जागेत इमारती, भिंतीपासून दूर यावे.’

- डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news shahada aria earthquake